हिलदारी अभियानाअंतर्गत स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:26 AM2021-06-26T04:26:48+5:302021-06-26T04:26:48+5:30
महाबळेश्वर : हिलदारी अभियानांतर्गत महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद, संयुक्त वन व्यवस्थापन महासमिती व ग्रामपंचायत भौसे येथील घनकचरा व्यवस्थानात काम करणाऱ्या ...
महाबळेश्वर : हिलदारी अभियानांतर्गत महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद, संयुक्त वन व्यवस्थापन महासमिती व ग्रामपंचायत भौसे येथील घनकचरा व्यवस्थानात काम करणाऱ्या शंभरहून अधिक स्वच्छता कर्मचाऱ्यांना येथील हिरडा विश्रामगृह व पंचायत समितीच्या सभागृहात तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले.
घनकचरा व्यवस्थापनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे शिक्षण कमी झालेले असते. त्यामुळे त्यांना कचरा कसा गोळा करायचा व त्या वेळी कोणती खबरदारी घ्यायची याबाबत माहिती नसते. त्यामुळे त्यांनी केलेल्या चुकांमुळे संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागते. म्हणून अशा कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले तर ते आरोग्याची नक्कीच खबरदारी घेतील, यासाठी हिलदारी या संस्थेच्या वतीने स्वच्छता विभागात काम करणारे कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाची सोय करण्यात आली होती.
संशोधक डाॅ. विनिता बाळ या गेली चाळीस वर्षांपासून घनकचरा व्यवस्थापनात काम करणारे कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहेत. कचरा कसा हाताळायचा, कचऱ्याचे प्रकार कोणते आहेत, घातक कचरा हाताळताना कोणती खबरदारी घ्यायची, कोरोना महामारीचा मुकाबला कसा करायचा, कोरोना लसीचे महत्त्व व त्याबाबतचे गैरसमज याविषयी माहिती दिली.
या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी अडचणी विचारून शंकांचे निरसन करून घेतले. मुंबईच्या केईएम रुग्णालयाच्या डाॅ. कामाक्षी भाटे यांनी कर्मचाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. प्रशिक्षणासाठी उपवन संरक्षक महादेव मोहिते, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, गटविकास अधिकारी नारायण घोलप, वनक्षेत्रपाल दिलीप झगडे, संयुक्त वन व्यवस्थापन महासमितीचे सचिव एल. डी. राऊत यांचे या प्रशिक्षणासाठी महत्त्वाचे योगदान लाभले. डाॅ. मुकेश कुलकर्णी यांनी केले होते.