खरीप हंगाम पूर्व नियोजनासाठी ४५ गावांतील शेतकऱ्यांना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:38 AM2021-05-14T04:38:27+5:302021-05-14T04:38:27+5:30
कोपर्डे हवेली : अवकाळी पावसाने हुमणी किडीचे भुंगेरे बाहेर पडतात. त्याच्या नियंत्रणासाठी शेतामध्ये घरगुती पद्धतीने प्रकाश सापळ्यांचा वापर ...
कोपर्डे हवेली : अवकाळी पावसाने हुमणी किडीचे भुंगेरे बाहेर पडतात. त्याच्या नियंत्रणासाठी शेतामध्ये घरगुती पद्धतीने प्रकाश सापळ्यांचा वापर करणे, २०२० - २१ च्या खरीप हंगामातील स्वत:कडील अथवा शेतकऱ्यांकडील बियाणांचा वापर, पेरणीसाठी आणि टोकणीसाठीच्या पद्धती, रोपातील अंतर, टोकण पद्धतीने जास्ती जास्त सोयाबीन पिकाची लागवड केल्यास उत्पादनात वाढ होते, असे आवाहन कृषी खात्याकडून करण्यात येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या खरीप पूर्व हंगामात शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यायची, या विषयाचे नियोजन सैदापूर कृषी मंडलाच्या माध्यमातून आणि उपविभागीय कृषी अधिकारी दौलतराव चव्हाण, कराड तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला, मंडल अधिकारी विनय कदम, हेमंत धापटे, यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना केले जात आहे.
सोयाबीन तसेच इतर खरीप हंगामातील पिकांसाठी पेरणीपूर्वी जैविक व रासायनिक बीज प्रक्रिया करावी, जैविक बीजप्रक्रियेमुळे आवश्यक असणाऱ्या रासायनिक खतामध्ये दहा टक्क्यांपर्यंत बचत होऊन उत्पादन खर्च कमी होतो. त्याचप्रमाणे रासायनिक प्रक्रिया केल्यामुळे सदर पिकांमध्ये कीड व रोगाचा प्रादुर्भाव कमी होऊन उत्पादन वाढ होते.
खरीप हंगामातील पूर्व नियोजनासाठी मंडल कृषी कार्यालय सैदापूर यांच्या मार्फत पंचेचाळीस गावातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण व माहिती देण्यात येत आहे.
फोटो ओळ
कृषी मंडळ सैदापूर येथे शेतकऱ्यांना माहिती देताना मंडळ अधिकारी विनय कदम.