उंब्रजच्या विलगीकरण कक्षातील १८ रुग्णांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:27 AM2021-06-18T04:27:16+5:302021-06-18T04:27:16+5:30
उंब्रज : उंब्रज व परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने येथील विलगीकरण कक्षाच्या आवारात पावसासह उत्तर मांड नदीचे पाणी साचले. ...
उंब्रज : उंब्रज व परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने येथील विलगीकरण कक्षाच्या आवारात पावसासह उत्तर मांड नदीचे पाणी साचले. त्यामुळे तेथे उपचार घेत असलेल्या २९ रुग्णांपैकी १८ रुग्णांना तातडीने यशवंतनगर येथील सह्याद्री कोविड सेंटर येथे हलविण्यात आले. उर्वरित ११ रुग्णांना वैद्यकीय सल्ल्याने डिस्चार्ज देण्यात आला.
बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मांड नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होऊ लागली. परिणामी नदीपात्रातील पाणी पात्राबाहेर गेल्याने सदरचे पाणी नजीकच्या कोविड विलगीकरण कक्षाच्या आवारात साचले. संपूर्ण विलगीकरण कक्षाला पाण्याचा वेढा पडला होता. सदर घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच सदर विलगीकरण कक्षातील १८ रुग्णांना यशवंतनगर येथील सह्याद्री कोविड विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले, तर उर्वरित ११ कोरोनामुक्त रुग्णांचा कालावधी संपल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार, रोटरीचे माजी अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य सुधाकर जाधव, मंडलाधिकारी युवराज काटे यांच्यासह रोटरीचे पदाधिकारी उपस्थित होते.