एकाच विभागात पाच वर्षे ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांची बदली, सातारा जिल्हा परिषदेच्या सीईओंची कार्यवाही
By नितीन काळेल | Published: June 16, 2023 07:07 PM2023-06-16T19:07:19+5:302023-06-16T19:08:14+5:30
दोन वर्षांपासून रखडलेली प्रक्रिया
सातारा : सातारा जिल्हा परिषदेतील एकाच विभागात पाच वर्षांपासून ठाण मांडणाऱ्या कर्मचारी बदलीचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढला. यामुळे १८ जणांची बदली स्थानांतराने दुसऱ्या विभागात झाली आहे. तर काेरोनामुळे रखडलेली ही बदली प्रक्रिया दोन वर्षानंतर पार पडली आहे.
याबाबत माहिती अशी की, मे महिन्यात जिल्हा परिषदेतील वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यावेळी प्रशासकीय, आपसी आणि विनंती बदल्या झाल्या होत्या. कृषी, सामान्य प्रशासन, पशुसंवर्धन, प्राथमिक शिक्षण, बांधकाम आरोग्यसह इतर विभागातील कर्मचाऱ्यांसाठी ही प्रक्रिया होती. त्याचवेळी जिल्हा परिषदेतील एकाच विभागात पाच वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची बदली होणार का ?, मुख्य कार्यकारी अधिकारी याबाबत काय निर्णय घेणार याबाबत चर्चा सुरू झाली होती.
आता मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी एकाच विभागात पाच वर्षे ठाण मांडलेल्या १८ कर्मचाऱ्यांची बदली केली आहे. कनिष्ठ सहायक ११ आणि वरिष्ठ सहायक ७ अशाप्रकारे या बदल्या केलेल्या आहेत. संबंधितांची स्थानांतराने जिल्हा परिषदेतच पण, दुसऱ्या विभागात बदली झालेली आहे. यामधील काहीजण या बदलीवर नाराज आहेत. पण, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा हा निर्णय सर्वांनाच मान्य करावा लागणार आहे.
यापूर्वी भागवत यांच्या काळात बदली...
जिल्हा परिषदेतील एकाच विभागात पाच वर्षे झालेल्या कर्मचाऱ्यांची बदली अडीच वर्षांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी असणारे संजय भागवत यांनी केली होती. तर याचदरम्यान, कोरोना संकट सुरू झाले. त्यानंतर संजय भागवत यांच्या जागी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विनय गाैडा हे आले. कोरोनामुळे त्यांच्या कार्यकाळात यामधील बदली प्रक्रिया पार पडली नव्हती. आता मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी १८ जणांची बदली केली आहे.