पाच तहसीलदारांच्या बदल्या
By admin | Published: July 6, 2016 10:54 PM2016-07-06T22:54:30+5:302016-07-07T00:51:51+5:30
साताऱ्यात चव्हाण, जावळीत आखाडे, पाटणला भोसले यांच्याकडे पदभार
सातारा : जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या पाच तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी रात्री विभागीय आयुक्त कार्यालयातून निघाले आहेत. बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश निघाले असून, संबंधित जिल्हाधिकारी त्यांना नेमणुका देणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तहसीलदारांच्या बदलीचे अधिकार विभागीय आयुक्तांना दिल्यानंतर आयुक्त पातळीवरून हे आदेश निघाले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या जयश्री आव्हाड यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी योजना विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे, तर आर. एस. भोसले यांना पाटणचे तहसीलदार म्हणून पदभार दिला आहे. तसेच पुणे जिल्ह्यात कार्यरत असणारे नीलप्रसाद चव्हाण यांच्याकडे सातारा तहसीलदार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर रोहिणी आखाडे यांची जावळीच्या तहसीलदार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. नेमणुकीच्या प्रतीक्षेत असणारे तहसीलदार विवेक जाधव यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वसाधारण विभागाचा पदभार देण्यात आला आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत मंगळवारी रात्री या बदल्यांचे आदेश निघाले आह
ेत. (प्रतिनिधी)
पाचही अधिकारी जिल्ह्याबाहेर!
साताऱ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांची कोल्हापूरला बदली झाली आहे. पाटणचे तहसीलदार रवींद्र सबनीस आणि जावळीचे तहसीलदार रणजित देसाई या दोघांचीही पुणे जिल्ह्यात बदली झाली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असणारे तहसीलदार चंद्रशेखर सानप यांची कोल्हापूर जिल्ह्यात, तर सविता लष्करे यांची सांगली जिल्ह्यात बदली झाली आहे.