मोडतायत पाय; तरीही एसटी विभाग झोपला हाय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 04:38 PM2017-10-31T16:38:01+5:302017-10-31T17:13:33+5:30
सातारा येथील मध्यवर्ती बसस्थानकात असणारे गटारीचे धोकादायक चेंबर प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबईतील रहिवाशी आदिश्री सचिन शिखरे हिचा चेंबरमधील जाळीत पाय गेला होता. दैव बलवत्तर व प्रवाशांनी वेळीच आपत्कालीन उपाययोजना राबविल्याने ती वाचली.
सातारा : येथील मध्यवर्ती बसस्थानकात असणारे गटारीचे धोकादायक चेंबर प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबईतील रहिवाशी आदिश्री सचिन शिखरे हिचा चेंबरमधील जाळीत पाय गेला होता. दैव बलवत्तर व प्रवाशांनी वेळीच आपत्कालीन उपाययोजना राबविल्याने ती वाचली. अशी आणखी जाळ्या धोकादायक स्थितीत असून, धावपळीत या जाळीत पाय जाऊन दररोज अपघात होत आहेत.
बसस्थानकातील रस्त्यांचे नुतनीकरण करण्यात आले. ठिकठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी चेंबर काढण्यात आले असून, त्यावर जाळ्या टाकण्यात आल्या आहेत. या चेंबरची खोली साधारणपणे ५ फूट इतकी आहे. जाळीतून सहजरीत्या पाय आत जातो.
लहान मुलांचे पाय छोटे असतात, त्यामुळे चालता-चालता या जाळीत पाय कधी गेला हे कळत देखील नाही. एसटी बस पकडण्यासाठी नेहमीच प्रत्येकाची गडबड असते. एसटी चुकल्यावर तासन्तास बस स्थानकावर बसू राहावे लागते, हा त्रास टाळण्यासाठी प्रवासी नेहमीच गडबड करीत असतात.