‘पारदर्शी’ काचेचा ‘फिल्मी’ ड्रामा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 01:01 AM2017-08-27T01:01:35+5:302017-08-27T01:08:44+5:30
प्रश्न केवळ दोनशे रुपयांच्या दंडाचा नव्हता. विषय फक्त सर्वसामान्यांसमोर फाडल्या गेलेल्या फिल्मचाही नव्हता. हा अपमान एका आमदाराला जनतेसमोर कमी लेखण्याचा होता... अन् तोही आमदार कुणी साधा सुधा नव्हता. सत्ताधारी होता. सत्तेचा ईगो कुरवाळण्याची सवय लागलेल्या मानसिकतेचा होता. ‘पोलिस खात्यानं कारवाई केली, यापेक्षा एका अधिकाºयानं आपल्याला अत्यंत किरकोळीत काढलं,’ याचं दु:ख अधिक होतं... अन् हीच चूक हांडेंना भोवली. अधिकाºयाचं नाव ‘युवराज’ असलं तरी आमदारांचंही नाव ‘शंभूराज’ होतं.
अवघ्या महाराष्ट्रात ‘पारदर्शी’ कारभाराचा ढोल पिटविणाऱ्या सत्ताधाºयांच्या ‘काळ्या’ काचेचा ‘फिल्मी’ ड्रामा साताऱ्यात भलताच रंगलाय. केवळ आपल्या गाडीची फिल्म भरचौकात एका पोलिस अधिकाºयांनं टराऽऽ टरा फाडून काढली, या रागापोटी थेट गृहमंत्रालयातून या अधिकाºयाला सक्तीच्या रजेवर पाठविणाºया शिवसेना आमदाराच्या रुपात ‘अहंकारी’ सरकारची मानसिकताच पुन्हा एकदा जगासमोर आलीय.
शहर वाहतूक शाखेचा चार्ज घेतल्यापासून सहायक पोलिस निरीक्षक युवराज हांडे भलतेच चार्ज झालेले. ‘दिसली दुचाकी की टाक क्रेनवर’ अन् ‘दिसली कार की काढ फिल्म’ एवढाच एककलमी कार्यक्रम त्यांनी राबवायला सुरू केलेला. पंधरा-वीस दिवसांपूर्वी पोवई नाक्यावर स्वत: उभं राहून त्यांनी तब्बल अडोतीस गाड्यांच्या काचेची फिल्म काढून टाकली. त्यातलीच एक गाडी म्हणजे पाटणचे शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांची. ‘महाराष्ट्र विधानसभा सदस्य... आमदार’ असं विधीमंडळाचं ठसठशीत स्टिकर चिकटवलेलं असतानाही हांडे यांनी ही गाडी अडवायचं धाडस दाखविलं. ( तरी नशीब.. गाडीवर कुठं ‘उत्कृष्ट संसदपटू’ असं नेहमीच्या सवयीनं लिहिलं नव्हतं !)
गाडीत ड्रायव्हर एकटाच होता. गाडीच्या काचांना काळी फिल्म लावल्याबद्दल त्याला दोनशे रुपयांची पावती फाडायला सांगितली गेली. ड्रायव्हरनं थेट मालकिणीला कॉल लावून मोबाईल हांडेंच्या हातात दिला. ‘मी मिसेस देसाई बोलतेय... ही गाडी आमदारांची आहे. दंड भरून घ्या; पण फिल्म-बिल्म काढू नका. आमदारसाहेब अधिवेशनातून गावी आल्यानंतर स्वत:हून काढू !,’ असं तिकडून सांगितलं गेलं. मात्र ‘आमदारांची असू दे नाही तर दुसºया कुणाऽऽ ची.. फिल्म तर काढावीच लागेल मॅडमऽऽ’ असं सांगत हांडेंनी सहकाºयांना खुणावलं.
पडत्या फळाची आज्ञा म्हणा किंवा फाडल्या पावतीचा आनंद... इतर पोलिसांनीही या गाडीच्या काचांची फिल्म टराऽऽ टरा फाडून टाकली. शेकडो लोकांसमक्ष अक्षरश: ओरबडूऽऽन काढली. एका सत्ताधारी आमदारालाही सातारा पोलिस गिनत नाहीत, हे चित्र टिपण्यासाठी अनेकांचे मोबाईल फ्लॅश सकट चकाकले.
नियमावर बोट ठेवून हांडेंच्या टीमनं देसार्इंच्या गाडीवर कारवाई केली असली तरी ‘गाडी आमदारांची असू दे नाही तर दुसºया कोणाऽऽची..,’ हा डॉयलॉग संबंधितांना भलताच जिव्हारी लागला. प्रश्न केवळ दोनशे रुपयांच्या दंडाचा नव्हता. विषय फक्त सर्वसामान्यांसमोर फाडल्या गेलेल्या फिल्मचाही नव्हता. हा अपमान एका आमदाराला जनतेसमोर कमी लेखण्याचा होता... अन् तोही आमदार कुणी साधा सुधा नव्हता. सत्ताधारी होता. सत्तेचा ईगो कुरवाळण्याची सवय लागलेल्या मानसिकतेचा होता. ‘पोलिस खात्यानं कारवाई केली, यापेक्षा एका अधिकाºयानं आपल्याला अत्यंत किरकोळीत काढलं,’ याचं दु:ख अधिक होतं... अन् हीच चूक हांडेंना भोवली. अधिकाºयाचं नाव ‘युवराज’ असलं तरी आमदारांचंही नाव ‘शंभूराज’ होतं, हे सक्तीच्या रजेवर गेल्यानंतर निवांतक्षणी आत्मचिंतन करताना या अधिकाºयाला नक्कीच जाणवलं असणार, यात शंकाच नाही.
शंभूराज हे कागदोपत्री शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले असले तरी त्यांची अधिक उठबस देवेंद्रपंतांच्या सोबतच. आपल्या ‘अष्टप्रधान मंडळा’त शंभूराज सहभागी व्हावेत, ही पंताची म्हणे मनोमन इच्छा. मात्र नाकातली नथणी अधिक जड होऊ नये म्हणून कदाचित सेना प्रमुखांनी त्यांना प्रत्येक बदलावेळी अलगद बाजूलाच ठेवलेलं. मात्र, तरीही पाटणचा वाघ भलताच हुश्शाऽऽर. झेडपीच्या रणांगणात खुद्द पक्षाच्या जिल्हाप्रमुखालाही चारी मुंड्या चीत करण्याची खेळी यशस्वी करून दाखविलेली.
असो. मूळ विषय.. मुंगी मारण्यासाठी ब्रह्मास्त्र वापरण्याचा. आपल्या गाडीला हात लावणाºया अधिकाºयाला दहा दिवसांसाठी का होईना, घरी बसविण्यासाठी त्यांनी थेट गृहमंत्रालयाचा दरवाजा ठोठावला. कोकणच्या केसरकरांना गाठलं. तिथनं थेट साताºयाला फोन करायला लावलं. देसार्इंचं काम फत्ते झालं. त्यांच्या गाडीला हात लावण्याचं धाडस करणारी अखेर ‘खाकी’ गपगुमानं घरपोच गेली.
मुंबैतली ‘पंतांची मैत्री’ कामाला आली. पाटणची ‘शंभूशक्ती’ही जगाला कळून चुकली; परंतु एवढी प्रचंड ताकद त्यांनी जिल्ह्याच्या एखाद्या मोठ्या विकासकामासाठी वापरली असती तर किमान सातारकरांनी मनापासून धन्यवाद तरी दिले असते, अशी खोचक वजा कुजबूज खुद्द भगवी उपरणं घातलेली त्यांच्याच पक्षाची कट्टर ‘जय महाराष्ट्र’वाली मंडळी खासगीत करू लागली, त्याचं काय? आता बोला...
कालच्या शुक्रवारची गोष्ट. गणेशोत्सवाचा पहिला दिवस. साताºयाची बाजारपेठ गर्दीनं खचाखच भरलेली. मोती चौकात एक पांढरी गाडी येऊन उभारली. आतून प्रतिष्ठित व्यक्ती उतरली... अन् पंचमुखी गणेशाच्या दर्शनासाठी निघून गेली. गाडी भर चौकातच थांबल्यानं ट्रॅफिक जाम होऊ लागलं. तेव्हा शेजारी उभारलेल्या ट्रॅफिक पोलिसानं गाडी पुढे नेऊन पार्किंग तळावर लावण्याची सूचना केली. मात्र, ड्रायव्हरनं मोठ्या ऐटीत ‘आमदार साहेबांची गाडी आहे. हलवणार नायऽऽ’ असं ठणकावून सांगितलं. संबंधित पोलिस गुपचूपपणे डोकं खाजवत कोपºयात गेला. तिथं तीन- चार पोलिसांचं पथक अगोदरपासून उभं होतं. त्यांच्यात अस्वस्थ चर्चा झाली. मात्र, चुळबुळण्याशिवाय या साºयांनी काहीच केलं नाही.
अखेर, पंधरा- वीस मिनिटांनी आमदार आले. गाडीत बसून निघून गेले. त्यानंतर या पथकानं शिट्ट्या वाजवत चौकात तुंबलेली गर्दी हटवायला सुरू केली.. कारण इतकावेळ छाताडावर एवढी मोठी तीच ती ‘फिल्म’वाली गाडी घेऊन उभारलेल्या बिच्चाºयांना बाकीच्या किरकोळ वाहनांना हलवायला तोंड होतंच कुठंं? आपण काही बोलायला गेलो अन् आपल्यालाही ‘संपूर्ण गणेशोत्सव’ साजरा करायला थेट घरी पाठविलं गेलं तर? हा भीतीदायक प्रश्न त्यांच्यापुढं फेर धरून नाचत होता. सेनापतीविना रणांगणात लढणाºया शूरवीरांनी आत्मविश्वास गमावल्याचं हे लक्षण होतं; कारण साताºयात ‘खादी’ जिंकली होती. ‘खाकी’ हरली होती.
हंडे आल्यापासून वाहतूक शाखेचं उत्पन्न कैकपटीनं वाढलं. रोज नोटा मोजून- मोजून कर्मचाºयांची बोटं दुखू लागली. रात्री झोपेतही त्यांच्या डोळ्यासमोर म्हणे पावतीच नाचू लागली. मात्र, हे सारं करत असताना आपलं मुख्य कर्तव्यच विसरल्यागत ही मंडळी वागू लागली. समोरच्या चौकात ट्रॅफिक जाम झालं असलं तरीही त्याच्याशी आपलं काहीच सोयरसुतक नसल्यागत दाखवू लागली. ‘वन-वे’त शिरण्याच्या मार्गावर उभारून ‘सातारकरांनी नियम मोडू नयेत,’ हे समजावून सांगण्याऐवजी उलट ‘ते चुका करताना रंगेहाथ कसं सापडतील,’ यावरच अधिक भर देऊ लागली. फक्त ‘वन-वे’ संपण्याच्या वळणावर ‘बकरा’ येण्याची वाट बघत टपून उभारू लागली.. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, वाहन चालकाला गोडीत समजावून पावती फाडण्यापेक्षा समोरचा गुन्हेगारच आहे, या आविर्भावात दंड ठोठावण्याचा उग्र पायंडा पडू लागला. कदाचित याच सवयीतून आमदारालाही कमी लेखण्याचा प्रमाद (?) घडला असावा... परंतु यातून शेवटी निष्पन्न काय झालं? वाहतूक खात्याच्या टारगेटचा ‘हंडा’ भरला की अती कठोरपणाच्या प्रायश्चिताचा ‘घडा’.. याचा शोध खुद्द डिपार्टमेंटमध्येच सुरू झालाय.
कधीकाळी एका सत्ताधारी मंत्रीबंधूला अत्याचाराच्या गुन्ह्यात रात्रीतून घरातून उठवून ताब्यात घेणारी धाडसी ‘खाकी’ अलीकडच्या काळात सत्ताधारी ‘खादी’ समोर पुरती हतबल झालीय की काय, अशी शंका विरोधकांमधून विचारली जाऊ लागलीय.
..तरीही ‘सातारी खाकी’ बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करू लागलीय. एकीकडं कºहाडच्या मतदान केंद्रात एका सहकार नेत्याला सुनावणाºया साध्या महिला कॉन्स्टेबलच्या धाडसाचं गौरव करू लागलीय... तर दुसरीकडं समोरच्या ‘खादी’ला मिठ्या मारून नंतर अटक करण्याचं कसबही हीच ‘खाकी’ आत्मसात करू लागलीय.
- सचिन जवळकोटे, सातारा .