साताऱ्यातील 'आर्यांग्ल' कडून ९ कल्पवृक्षांना जीवदान, २० वर्षांच्या झाडांचे केले प्रत्यारोपण
By प्रगती पाटील | Published: May 6, 2024 07:02 PM2024-05-06T19:02:17+5:302024-05-06T19:04:15+5:30
सातारा : वृक्षारोपण जितकं महत्त्वाचं आहे तितकच वृक्ष संवर्धनही गरजेचे आहे. याचा प्रत्यय आर्यांग्ल हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने दिला. त्यांनी बांधकामात ...
सातारा : वृक्षारोपण जितकं महत्त्वाचं आहे तितकच वृक्ष संवर्धनही गरजेचे आहे. याचा प्रत्यय आर्यांग्ल हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने दिला. त्यांनी बांधकामात अडथळा ठरणाऱ्या 9 कल्पवृक्षांचे प्रत्यारोपण करून त्यांना जीवदान दिले. त्याचबरोबर हॉस्पिटल परिसराच्या निसर्ग सौंदर्यात भर घातली.
आयुर्वेद प्रसारक मंडळी संचलित आर्यांग्ल हॉस्पिटलच्या बाह्य रुग्ण विभागाच्या विस्तारित इमारतीचे बांधकाम नियोजित आहे. या बांधकामात १५ ते २० फूट उंचीची नारळाची नऊ झाडे अडथळा ठरत होती. त्यामुळे सुरुवातीला ती तोडण्याचा निर्णय झाला होता. तथापि 15 ते 20 वर्षांची ही झाडे तोडण्यापेक्षा जवळपास तेवढ्याच खर्चात हॉस्पिटलच्या आवारात त्यांचे प्रत्यारोपण करता येईल, असा पर्याय हरित सातारा ग्रुपने सुचवला. साताऱ्यातील वसंत पाटील असोसिएटचे संचालक, प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक दीपक पाटील यांनी या कामी पुढाकार घेत लगेच कार्यवाही सुरू केली. हॉस्पिटलच्या आवारातच कुंपणाच्या बाजूला खड्डे काढून एका दिवसात सर्व नऊच्या नऊ झाडांचे प्रत्यारोपण करण्यात आले.
या प्रक्रियेविषयी बोलताना दीपक पाटील म्हणाले, "झाडे नैसर्गिक सावली देतात. सिमेंटच्या इमारती थंड ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे ऊर्जेचा खर्च कमी होतो. झाडे हवेतील प्रदूषक फिल्टर करतात, त्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारून निरोगी मानवी जीवनासाठी ती सहाय्यभूत होतात. एखाद्या झाडाचे संगोपन करून त्याची पूर्ण वाढ होण्यासाठी 15 ते 20 वर्षांचा कालावधी जातो. प्रत्यारोपणामध्ये पूर्ण वाढ झालेलं झाडच लावले गेल्यामुळे वाया जाणारा कालावधी आपण वाचवू शकतो."
"पृथ्वीचे तापमान वाढते आहे. त्याची दाहकता आपण सर्व सातारकर आज अनुभवतो आहे. अशा परिस्थितीत वृक्ष प्रत्यारोपण करून त्याच्या संवर्धनाचा स्तुत्य व अनुकरणीय निर्णय आर्यांग्ल हॉस्पिटल संचालक मंडळाने घेतला. झाडे लावण्याबरोबरच पूर्वीच्या झाडांचे व नव्याने लावलेले झाडांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे" - दीपक पाटील, संचालक, वसंत पाटील & असोसिएट