चारा-पाण्याचे दुर्भिक्ष वाढल्याने मेंढपाळांचे कोकणात स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 01:16 PM2019-04-04T13:16:47+5:302019-04-04T13:21:07+5:30
अतिवृष्टीचा प्रदेश ओळख असलेल्या वाई तालुक्यात दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस न पडल्याने पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात भीषणता वाढत चालली आहे. धरणे
वाई : अतिवृष्टीचा प्रदेश ओळख असलेल्या वाई तालुक्यात दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस न पडल्याने पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात भीषणता वाढत चालली आहे. धरणे, तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे जनावरे कसे जगवायची? हा प्रश्न सतावत आहे. या भागातील मेंढपाळ कोकणात स्थलांतर करू लागले आहेत.
या भागातच ओढे-जोड प्रकल्प राबविण्यात आले आहेत. परंतु दुष्काळ निवारण्यासाठी त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल वाया गेला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा वापर काही भागात करण्यात येत आहे; पण मेंढ्या पाळणाºयांना पाण्याचा उपयोग होत नाही. ओढे, नाले, तलाव कोरडे पडल्याने प्राण्यांना पाणी पाजणे कठीण होते.
वाई तालुक्याच्या पूर्व भागातील व खंडाळा, लोणंद, फलटण व उत्तर कोरेगाव परिसरातील मेंढपाळांनी मेंढ्यांसह स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. पाणी-चाºयासाठी कोयनानगर परिसरात आसरा घेणार असल्याचे मेंढपालांकडून समजले. ही अतिशय गंभीर बाब असून, मुक्या प्राण्यांचा जीव वाचवण्यासाठी कित्येक किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.
वाईच्या पूर्व भागात दुष्काळाची भीषणता जास्त पाहावयास मिळते. या भागात पावसाचे प्रमाण नेहमीच अत्यल्प असते. त्यात या परिसरात जलशिवारची कामेही शासनाकडून प्रभावीपणे न राबविल्याने या भागातील लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. भटकंती करणाºयाला याची मोठी झळ पोहोचते. या भागात कोणताही आधार शिल्लकच न राहिल्याने स्थलांतर केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, हे ओळखूनच मेंढपाळांनी स्थलांतराचा मार्ग निवडल्याचे चित्र आहे. कोयना परिसरात पाण्याचा प्रश्न काहीअंशी मिटला असलातरी चाºयाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार आहे.
शेळ्या-मेंढ्यांसाठी छावणी सुरू करावी
दुष्काळ निवारण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे. जर जनावरांसाठी शासन छावण्या उभारणार असेल तर त्यावेळी शेळ्या-मेंढ्यांचाही विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.