Crime News: काजूच्या टरफलांच्या गोण्या खालून मद्याची वाहतूक, ५३ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 12:34 PM2022-06-28T12:34:43+5:302022-06-28T12:35:23+5:30
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून गोव्याहून राजस्थानला गोवा बनावटीच्या विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क व भरारी पथकाला मिळाली होती.
कऱ्हाड : ट्रकमध्ये काजूच्या टरफलांच्या गोण्या रचून त्याखालून दारूच्या तब्बल ३६ हजार बाटल्यांची वाहतूक करणाऱ्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. उत्पादन शुल्कच्या सातारच्या भरारी पथकाने रविवारी रात्री उशिरा ही कारवाई केली. आरोपींकडून ५३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मुकेश मोहनलाल सिसोदिया (वय ३९, रा. खजुरिया, ता. हातोड, जि. इंदोर, मध्य प्रदेश) व जितेंद्र भगतसिंग राठोड (वय ३६, रा. मेथवाडा, ता. डेपालपूर, जि. इंदोर, मध्य प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
उत्पादन शुल्कच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून गोव्याहून राजस्थानला गोवा बनावटीच्या विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क व भरारी पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क व भरारी पथकाने संबंधित ट्रकचा पाठलाग करुन खोडद गावच्या हद्दीत तो ट्रक अडवला.
संबंधित ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये विदेशी दारूचे ७५० बॉक्स व दारूचे बॉक्स लपवण्यासाठी वापरलेल्या काजूच्या टरपलांच्या ४७ गोणी आढळून आल्या. दारुचे बॉक्स, टरपालांची गोणी आणि ट्रकसह ५३ लाख २९ हजार २७५ रुपयांचा मुद्देमाल उत्पादन शुल्कने आरोपींकडून जप्त केला आहे. तसेच मुकेश सिसोदिया व जितेंद्र राठोड यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
प्रभारी निरीक्षक एन. पी. क्षीरसागर, निरीक्षक संजय साळवी, दुय्यम निरीक्षक किरण बिरादार, रोहित माने, महेश मोहिते, नितीन जाधव, सचिन खाडे, संतोष निकम, अजित रसाळ, जीवन शिर्के, किरण जंगम, भीमराव माळी, विनोद बनसोडे, राणी काळोखे यांनी ही कारवाई केली.