शेतमाल वाहतूक झाला आंतबट्ट्याचा व्यवसाय..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:40 AM2021-02-24T04:40:36+5:302021-02-24T04:40:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : इंधन दरात वाढ झाल्याने महागाईचे चटके बसू लागलेत. मात्र, शेतमाल वाहतूक करणारे वाहनधारक अजूनही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : इंधन दरात वाढ झाल्याने महागाईचे चटके बसू लागलेत. मात्र, शेतमाल वाहतूक करणारे वाहनधारक अजूनही भाडेवाढीच्या विचारात नाहीत. बाजारात मंदी, शेतमालाला दर कमी, यामुळे शेतकऱ्यांचेच भागेना मग भाडेवाढ करून धंदाच बंद करायचा का, असा सवालही त्यांच्याकडून होत आहे. त्यामुळे वाहनधारकांना इच्छा असूनही भाडे वाढविता येईना.
मागील काही दिवसांपासून इंधनाचे दर वाढू लागले आहेत. या इंधन दरवाढीचा सर्वच घटकांवर हळूहळू का होईना परिणाम होऊ लागला आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी भाडेवाढीचे संकेत दिले आहेत. काही ठिकाणी अल्प भाडेवाढही झालेली आहेे पण शेतमाल, तरकारीची वाहतूक करणाऱ्यांनी अजूनही भाडेवाढ केलेली नाही.
सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील अनेक ठिकाणांहून शेतमाल येतो. यामध्ये माण, खटाव, फलटण, खंडाळा, जावळी, कोरेगाव अशा तालुक्यांतून तरकारी येते. ठरावीक वाहनधारकच शेतमाल घेऊन येतात. बहुतांशी शेतकरी एकाच वाहनधारकांच्या माध्यमातून आपला माल बाजार समितीत पोहोच करतात. यासाठी प्रत्येक डागामागे काही पैसे आकारले जातात. सातारा तालुक्यातून शेतमाल घेऊन बाजार समितीत यायचे असेल तर एका डागाला ३० ते ४० रुपये घेतले जातात. जेवढे वाहनांत डाग भरू तेवढे पैसे शेतकऱ्यांकडून आकारले जातात. तर खंडाळा, फलटण किंवा खटाव, माण तालुक्यातून शेतमाल सातारा बाजार समितीत आणायचा झाला तर अंतरानुसार ६० ते ८० रुपये एका डागाला घेतले जातात.
सातारा बाजार समितीत तर सायंकाळपासून वाहनधारक शेतमाल घेऊन येतात. पहाटेपर्यंत बहुतांशी वाहनधारक आलेले असतात. वाहनधारकांबरोबर काहीवेळा शेतकरीही येतात. सकाळी ११ पर्यंत दर निघाला की शेतकरी व वाहनधारक गावाकडे परतात; पण एवढे करूनही वाहनधारकांना सध्या कसाबसा धंदा करावा लागतोय. कारण, डिझेलचा दर ९० रुपयांच्या जवळ पोहोचलाय. त्यामुळे भाडेवाढीशिवाय पर्याय नाही; पण बाजारात मंदी आहे. शेतमालाला म्हणावा असा उठावच नाही. शेतकऱ्यांचाच खर्च निघेना. त्या ठिकाणी भाडेवाढ करून काय साध्य होणार, हा विषय आहे. त्यामुळे सध्यातरी भाडे वाढ न करण्याच्या विचारात वाहनधारक आहेत.
चौकट :
७० रुपयांवर डिझेल होते,
तेव्हाचे भाडे आताही...
बाजारात मंदी आहे; पण अजूनही शेतमालाची वाहतूक करणारे वाहनधारक भाडेवाढीच्या विचारात नाहीत. ७० रुपये लिटर डिझेल होते. त्यावेळी शेतमाल वाहतुकीसाठी भाडे आकारले जायचे तेच भाडे डिझेल ९० च्या घरात गेल्यावरही आकारले जात आहे.
कोट :
डिझेलचा दर वाढला आहे. यामुळे भाडेवाढ होणे अपेक्षित आहे. मात्र अजूनही कांदा वगळता इतर शेतमालाला दर कमी असल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. बाजारात मंदी असल्याने अशा काळात भाडेवाढ करणे योग्य ठरणार नाही. ज्यांनी बँकांकडून वाहन घेतले आहे, हप्ता जाऊन त्यांच्या हातात काहीही राहत नाही.
- सतीश साबळे, वाहनधारक, शिवथर
फोटो दि. २३सातारा बाजारा समिती फोटो...
फोटो ओळ : सातारा बाजार समितीत जिल्ह्यातून शेतमाल मोठ्या प्रमाणात येतो. सकाळी १० पर्यंत वाहनांतून माल खाली उतरवला जातो. (छाया : नितीन काळेल)
..................................................................