मृत पिसोरीची वाहतूक; चौघांना अटक
By admin | Published: December 4, 2015 10:14 PM2015-12-04T22:14:41+5:302015-12-05T00:18:43+5:30
महाबळेश्वरात कारवाई : अपघात की शिकार? वनविभागाचा तपास सुरू
महाबळेश्वर : हरणासारखा दिसणारा पिसोरी हा मृतावस्थेतील वन्यप्राणी आपल्या वाहनातून घेऊन निघालेल्या तापोळा भागातील तीन शेतकरी व एक शिक्षक अशा चारजणांना महाबळेश्वरचे वनक्षेत्रपाल एस. डी. कुलकर्णी यांनी अटक केली असून, त्यांच्यावर वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी, रात्री पावणे आठ वाजता वन विभागाच्या कार्यालयात एक निनावी फोन आला होता. या फोनवरून मिळालेल्या माहितीवरून वनक्षेत्रपाल एस. डी. कुलकर्णी यांनी तातडीने पोलीस फौजफाटा मागविला. पोलीस व आपले वनकर्मचारी घेऊन सर्वजण तापोळ्याकडे निघाले असता मिळालेल्या माहितीनुसार एक चारचाकी गाडी आली, ती गाडी अडवून तपासणी केली असता, या गाडीत चालकासह चौघेजण होते. या गाडीतील डिकीमध्ये पिसोरी जातीचा वन्यप्राणी मृतावस्थेत आढळून आला. या वन्यप्राण्यास एका प्लास्टिकच्या गोणीमध्ये ठेवण्यात आले होते व त्यावर सामान ठेवले होते. वनविभागाने त्या चौघांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने वनक्षेत्रपालांनी चौघांना गुरुवारी रात्री चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये नितीन सीताराम भोसले (वय २८), किसन विठ्ठल भोसले (४५, दोघेही रा. तेटली, ता. जावळी), भाऊ रामचंद्र भोसले (५१, रा. मुनावळे, ता. जावळी) व संदीप जावजी सावंत (३२, रा. आकल्पे, ता. महाबळेश्वर) यांचा समावेश आहे.वन्यजीव संरक्षक अधिनियम १९७२ व भारतीय वन अधिनियम १९२७ च्या तरतुदीनुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिसोरी हा प्राणी हरणापेक्षाही दुर्मिळ असल्याने वाघ, सिंह या प्रमाणेच या प्राण्याचे कायदे कडक आहेत. त्यामुळे या प्राण्याची शिकार केली होती का, या प्राण्याची शिकार करून तस्करी केली जात होती की, या प्राण्याचे मटण खाण्यासाठी याची शिकार केली होती? याबाबत वनविभागाचे अधिकारी तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
शिकार केली नाही...!
अटक करण्यात आलेल्या संशयितांचे नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार ‘या चौघांनी या प्राण्याची शिकार केली नव्हती. अज्ञात वाहनांच्या धडकेत हा प्राणी ठार झाला होता. मात्र, ठार झालेला प्राणी घेऊन जाताना चौघेही वनविभागाच्या जाळ्यात अडकले. दरम्यान, मृत वन्य प्राण्याची वाहतूक प्रकरणाची माहिती मिळताच सहायक वनसरंक्षक महादेव मोहिते यांनी तत्काळ महाबळेश्वरला भेट दिली. मृत प्राण्याची पाहणी केली. पुढील तपासाच्या दृष्टीने सूचना केल्या. पिसोरी प्राण्याचा मृत्यू कशामुळे झाला, हे कळण्यासाठी मृत पिसोरीचे शवचिकित्सा करण्यात आल्याचेही वनविभागाने सांगितले.