खंडाळा तालुक्याभोवती आवळतोय फास..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:36 AM2021-04-19T04:36:14+5:302021-04-19T04:36:14+5:30

खंडाळा : खंडाळा तालुक्यात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या चार हजार आठशे पेक्षा जास्त झाली ...

Trap around Khandala taluka ..! | खंडाळा तालुक्याभोवती आवळतोय फास..!

खंडाळा तालुक्याभोवती आवळतोय फास..!

Next

खंडाळा : खंडाळा तालुक्यात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या चार हजार आठशे पेक्षा जास्त झाली आहे. तालुक्यात गेल्या बारा दिवसांत जवळपास ५६७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ४७४ जण अद्यापही उपचार घेत आहेत. नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे प्रशासनाच्या दक्ष कारभारानंतरही कोरोनाचा वाढता प्रसार तालुक्याभोवती फास आवळत असल्याने चिंतेचे वातावरण आहे.

लॉकडाऊनचे नियम व निर्बंध पाळणे लोकांनी अद्यापही गांभीर्याने घेतलेले नाही. त्यामुळेच रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लोकांचे प्रबोधन व्हावे व कायद्याचा धाक बसविणे खूप आवश्यक बनले आहे. ही संख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. खंडाळा तालुक्यातील ६३ गावांमध्ये कोरोनाने हातपाय पसरले असून, कोरोनाची एकूण संख्या ४८०६ पर्यंत पोहोचली आहे. तालुक्यात लोणंद येथील चार रुग्णालये, खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालय व शिरवळ येथील एका रुग्णालयात उपचारांची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, सध्या रुग्णांना बेड उपलब्ध होणे मुश्किल झाले आहे.

शिरवळ, खंडाळा, लोणंदसह अंदोरी, खेड बुद्रुक, विंग या गावातून रुग्णसंख्या अधिक आढळल्याने स्वतंत्र विलगीकरण कक्ष बनविले असले तरी होम क्वॉरंटाईन रुग्ण या कक्षात राहण्यास सहमत नाहीत, अशी स्थिती आहे. हेच रुग्ण व कुटुंबीय काळजी घेत नसल्याने कोरोनाच्या प्रसाराची धास्ती वाढली आहे. त्यातच कोरोना चाचणी करण्यासाठी विलंब होत असल्याने त्याचे अहवाल उशिरा येत असल्याने अनेक जण तपासणीच्या प्रतीक्षेत आहेत. खंडाळा व लोणंद नगरपंचायत क्षेत्रात प्रशासनाने नियम काटेकोर करून मेडिकल सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत. याशिवाय तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक सर्वाधिक बाधित गावात जाऊन जनजागृती करीत आहेत. पोलीस प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करणे सुरू केले आहे. तरीही लोकांनी स्वयंस्फूर्तीने नियम पाळणे बंधनकारक करायला हवे.

चाैकट..

कोविड केअर सेंटरची बेड संख्या वाढविणे गरजेचे..

गेल्या दहा दिवसांत तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येपैकी उपचारार्थ शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत २०८, लोणंद केंद्राअंतर्गत १५९ तर अहिरे केंद्रातंर्गत १०७ अशी एकूण ४७४ झाली आहे. तालुक्यात खासगी रुग्णालयातील काही व्हेंटिलेटर बेड सोडले तर इतर ठिकाणी ही सुविधा नाही. त्यामुळे सरकारी कोविड केअर सेंटरची बेड संख्या वाढविणे गरजेचे आहे.

चौकट..

उपकेंद्रांमध्ये आठवड्यातून एकदा लसीकरण!

तालुक्यात खंडाळा ग्रामीण रुग्णालय, शिरवळ, अहिरे, लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम सुरू आहे. तर इतर उपकेंद्रांमध्ये आठवड्यातून एकदा लसीकरण केले जाते. मात्र, लसीकरणाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात झाल्यास त्याचा वेग वाढविणे सहज शक्य आहे.

कोट...

खंडाळा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. तालुक्यात उपचाराची चांगली सुविधा उपलब्ध असली तरी अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांनी घराबाहेर पडू नये. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी नियम पाळून सहकार्य करावे. पोलीस प्रशासनाने सुध्दा नियमांची कडक अंमलबजावणी करून लोकांना नियम पाळणे बंधनकारक करावे.

-दशरथ काळे, तहसीलदार

१८खंडाळा

फोटो : ग्रामीण रुग्णालय खंडाळा येथे कोरोना चाचणीसाठी नागरिक प्रतीक्षेत आहेत.

Web Title: Trap around Khandala taluka ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.