सातारा येथील कर्मवीर कॉलनीत कचऱ्यांचे ढीग; घंटागाडी एकीकडे.. कचरा दुसरीकडे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 05:28 PM2017-11-30T17:28:42+5:302017-11-30T17:34:31+5:30
सातारा येथील राधिका रस्त्यावरील कर्मवीर कॉलनीमध्ये रस्त्याकडेलाच कचऱ्यांचे ढीग साचले असून, घंटागाडी एकीकडे तर कचरा दुसरीकडे, अशी अवस्था झाली आहे. या कचऱ्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न बिकट होत असून, पालिकेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
सातारा : येथील राधिका रस्त्यावरील कर्मवीर कॉलनीमध्ये रस्त्याकडेलाच कचऱ्यांचे ढीग साचले असून, घंटागाडी एकीकडे तर कचरा दुसरीकडे, अशी अवस्था झाली आहे. या कचऱ्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न बिकट होत असून, पालिकेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
राधिका रस्त्यावर कर्मवीर कॉलनी आहे. या कॉलनीमध्ये गेल्या काही दिवसांपासून चक्क रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात कचऱ्यांचे ढीग साचले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना तोंडाला रुमाला लावून जावे लागत आहे.
या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी याचे फोटो काढून पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविले आहेत. मात्र, तरी सुद्धा याची कोणी दखल घेतली नाही. रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक हा कचरा टाकत असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. या ठिकाणी कचरा कुंडीही नाही. तरीही कचरा टाकला जात आहे.
काही दिवसांपूर्वी या कचऱ्याशेजारी शाळेच्या मुलांची रिक्षा तेथे थांबली होती. त्यावेळी चिमुकल्यांनी रिक्षा चालकाला तेथून बाजूला रिक्षा नेण्यास सांगितले. हा प्रकार तेथे असणाऱ्या काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्या चिमुकल्यांचा फोटो काढून पालिकेत दिला.
मात्र अद्यापही याचा फारसा पालिकेच्या आरोग्य विभागावर फरक पडलेला दिसत नाही. हा कचरा तातडीने उचलला नाही तर पालिकेच्या दारात हा कचरा टाकून आंदोलन केले जाईल, असा इशाराही या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी दिला आहे.
घंटागाडी या परिसरात येते की नाही, हे कळायला मार्ग नाही, असे येथील रहिवासी सांगत आहेत. जर घंटागाडी येत असेल तर त्यांना रस्त्याकडेला असलेला कचरा कसा दिसत नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.