खोचीतील भैरवनाथाची यात्रा उत्साहात

By Admin | Published: April 12, 2017 12:13 AM2017-04-12T00:13:54+5:302017-04-12T00:13:54+5:30

‘चांगभलं’चा गजर : गुलाल-खोबऱ्याची उधळण, नयनरम्य आतषबाजी, धनगरी ढोलांचा निनाद

Travel to Bhairavnatha in Khochi | खोचीतील भैरवनाथाची यात्रा उत्साहात

खोचीतील भैरवनाथाची यात्रा उत्साहात

googlenewsNext

खोची : गुलालाची उधळण आणि सासनकाठी नाचवत खोची येथील भैरवनाथ चैत्र पौर्णिमा यात्रा उत्साहात झाली. नयनरम्य आतषबाजी, धनगरी ढोलांचा निनाद, उपरी समाजाच्या भक्तिमय गीताच्या साथीत पालखी सोहळा रात्रभर चैत्रबनात रंगला. तर सूर्योदयाला ‘श्रीं’चा सहचारिणी जोगेश्वरीशी परंपरागत विवाह सोहळा पार पडला आणि परगावचा भक्तगण ‘चांगभलं’च्या गजरात घरी परतला.
खोची येथील श्री भैरवनाथाची मुख्य यात्रा मंगळवारी झाली. हस्त नक्षत्रावर पालखी सोहळा तर चित्रा नक्षत्रावर ‘श्रीं’ चा विवाह सोहळा एक लाखावर भक्तगणांच्या उपस्थितीत फटाक्यांच्या आतषबाजीत झाला. मंगळवारी ‘श्रीं’ची दैनंदिन पूजा बांधल्यानंतर आरती झाली. परंपरागत राजसदरेवरील बैठी पूजा बांधली होती. सकाळच्या सत्रात मानकरी दिलीपराव सूर्यवंशी यांचा मानाचा नैवेद्य ‘श्रीं’ना अर्पण करण्यात आला. यावेळी मानाचा अश्व नैवेद्याबरोबर ‘श्रीं’च्या मंदिरात आणण्यात आला. यानंतर परगावच्या भाविकांनी ‘श्री’ना नैवेद्य, श्रीफळ अर्पण केले. दुपारी बुवाचे वठार येथील नैवेद्य पारंपरिक ‘गाडा’मधून आणण्यात आला. यावेळी परगावच्या भाविकांनी गुरव गोसावी डवरी वाढण्याचा कार्यक्रम उरकला.
रात्रौ १२ वाजता मुख्य पालखी सोहळ्याला सुरूवात करण्यात आली. यावेळी पालखी चैत्रबनात आणण्यात आली. पालखीसोबत मानकरी, सेवेकरी, पुजारी, परगावचे भक्त आपली सेवा देत होते. अब्दागिरी व छत्री घेऊन मगदूम, मडके समाज, चांदीच्या काठ्या घेऊन बाबर, गोसावी समाज, तलवार घेऊन चौगुले, पिंजरे-जाधव समाज चवऱ्या ठाळीत होत्या. चर्मकार समाज मशालीचा प्रकाश देत होते. भोसले, यशवंत, नाभिक, काटकर समाज परंपरागत पालखी सेवा करीत होते. पालखीसमोर मानाच्या सासनकाठ्या ‘श्रीं’च्या भेटीस आल्या. यानंतर कुंडल, आष्टा, माणकापूर, बुवाचे वठार, मायणी, विटा, सांगली, तळसंदे, कोल्हापूर, कुंभोज दुधगाव व खोची येथील बौध्द समाजाची आदी सासनकाठीची भेटा-भेटी झाल्या. चैत्रबनात फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी करण्यात आली. या ठिकाणी ‘श्रीं’च्या डवरी गीतांचा कथा कार्यक्रम करण्यात आला. तसेच पालखीवर भक्तगणांनी ‘चांगभलंऽऽ’च्या गजरात मुक्तहस्ते गुलाल-खोबरे यांची उधळण केली. त्यामुळे चैत्रबन गुलालात न्हावून गेला.
‘श्रीं’च्या यात्राकाळात पौर्णिमा महाप्रसाद सेवा समितीने महाप्रसादाचे आयोजन केले होते. दंडवत दर्शन घेणाऱ्या महिलांसाठी वारणा नदीतीरी स्नानगृहाची विशेष सोय समितीने केली होती. (वार्ताहर)+

सूर्योदयाच्या साक्षीने : विवाह सोहळा
चैत्रबनात पालखी सोहळा ‘श्री’च्या मूळस्थानी सईच्या झाडाखाली आणण्यात आला. या ठिकाणी ‘श्री’ची आरती करण्यात आली. यानंतर हा लवाजमा वारणा नदीपात्रात ‘श्रीं’च्या स्नानासाठी आला. ‘श्री’च्या स्नानानंतर मानकरी, सेवेकरी यांचा मान करण्यात आला. यानंतर वारणा नदी पात्रापासून पालखी पळवत आणण्यात आली. आणि राजसदरेवर विराजमान झाली. यानंतर सूर्योदयाच्या साक्षीने ‘श्रीं’ चा विवाह सोहळा झाला. भास्कर जोशी यांनी ‘श्रीं’च्या मंगलाष्टका व पौराहित्य केले.

Web Title: Travel to Bhairavnatha in Khochi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.