प्रवासी म्हणे... एसटीचे खासगीकरण नको रे बाबा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 02:22 PM2021-11-25T14:22:27+5:302021-11-25T14:30:36+5:30
जगदीश कोष्टी सातारा : प्रवासी हेच दैवत समजून एसटीने गेल्या सात दशकांहून अधिक काळ प्रवाशांची सेवा बजावली. उत्पन्नापेक्षा समाज ...
जगदीश कोष्टी
सातारा : प्रवासी हेच दैवत समजून एसटीने गेल्या सात दशकांहून अधिक काळ प्रवाशांची सेवा बजावली. उत्पन्नापेक्षा समाज हिताला प्राधान्य देत अनेक योजना राबविल्या. याच एसटीच्या खासगीकरणाचा विचार समोर येत आहे, असे झाल्यास गरीब रथ हा सर्वसामान्यांचा राहणार नाही. त्यामुळे एसटीचे खासगीकरण नको रे बाबा, असे प्रवाशी म्हणत आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघत नसल्याने खासगीकरणाची चाचपणी सुरू झाली. त्यामुळे एसटीचे कर्मचारी धास्तावले आहेत, तेवढाच प्रवाशांना हादरा बसला आहे. कारण एसटीचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे जेवढे एसटीवर प्रेम आहे, त्यापेक्षा जास्त सर्वसामान्य प्रवाशांचे आहे. कारण या एसटीने त्यांना कायमे भरभरून दिले आहे. महाबळेश्वर, जावळी, पाटण तालुक्यातील दऱ्याखोऱ्यातील गावांना एसटीने जोडून ठेवले आहे. खेड्यापाड्यांतील लोकांना शहरी भागातील झगमगाट दाखविला.
.. प्रवाशांची लूट होणार -
- एसटीत खासगी शिवशाही दाखल झाल्या, यामुळे प्रवाशांना सुखसोयी, वातानुकूलित गाड्या, मोबाइल चार्जर आदी सुविधा मिळाल्या.
- पण तेवढाच प्रवासही महागला. एसटीचे प्रवासी सर्वसामान्य आहेत. त्यांना जादा पैसे देऊन प्रवास करणे परवडणारे नाही. त्याचप्रमाणे विविध घटकांतील लोकांना प्रवासात सवलत मिळेल याची खात्री नाही.
एसटी वाचायला हवी..
एसटी ही सर्वसामान्यांना परवडणारी प्रवासी साधन आहे. गाव तिथं एसटी पोहोचली आहे. त्यामुळे एसटी वाचणे आवश्यक आहे. गुरुनाथ कदम,प्रवासी.
कोरोनापूर्वी एसटीचे सुरळीत चालले होते. त्यानंतर वाईट दिवस आले आहेत. म्हणून खासगीकरण करणे पर्याय ठरू शकत नाही.- लालसिंग परदेशी, प्रवासी.
राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांना काही ना काही देण्याचा प्रयत्न केला आहे. कर्मचाऱ्यांनीही आता तुटेपर्यंत ताणने योग्य ठरणार नाही.- दिगंबर जाधव,प्रवासी.