कास पठार परिसरात जखमी भेकरावर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:05 AM2021-02-05T09:05:46+5:302021-02-05T09:05:46+5:30
पेट्री : कास पठाराच्या खालील बाजूस कास तलाव परिसरात शनिवारी रात्री किरकोळ स्वरूपात जखमी अवस्थेत आढळून आलेल्या भेकरावर प्राथमिक ...
पेट्री : कास पठाराच्या खालील बाजूस कास तलाव परिसरात शनिवारी रात्री किरकोळ स्वरूपात जखमी अवस्थेत आढळून आलेल्या भेकरावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याच्या पुढील देखभालीसाठी पुणे येथील कात्रजच्या वन्यप्राण्यांच्या अनाथालयात वनविभाग बामणोलीचे अतिरिक्त वनपाल/वनरक्षक तसेच कास पठार कार्यकारिणी समितीचे कर्मचारी रविवारी दाखल केले.
बामणोलीचे अतिरिक्त वनपाल, वनरक्षक नीलेश रजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, कास धरणाजवळ शनिवारी रात्री साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास वनविभागाचे कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना काही मुलांचा घोळका दिसला. तेथे गेले असताना तिथे किरकोळ जखमी अवस्थेत असलेले एक भेकर निदर्शनास आले. प्रथम कर्तव्य म्हणून आढळून आलेल्या वन्यप्राण्याला ताब्यात घेऊन त्यावर प्राथमिक उपचार करणे. उपस्थित अतिरिक्त वनपाल बामणोली, वनरक्षक नीलेश रजपूत व वनरक्षक अर्जुन चव्हाण, तसेच कास पठार कार्यकारिणी समितीचे रात्रपाळीचे कर्मचारी यांनी मिळून संबंधित भेकराला कास पठार येथे आणले. बामणोली पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ. कवठे यांनी शनिवारी रात्री व रविवारी सकाळी या भेकरावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर पुढील देखभालीसाठी कात्रजच्या वन्यप्राण्यांच्या अनाथालयात दाखल केले. हे भेकर साधारण अडीच ते तीन वर्षांचे असून, नर जातीचे आहे.
चौकट
किरकोळ जखमी अवस्थेत सापडलेल्या भेकराच्या डोळ्याशेजारी खरचटले असून, मुका मार लागला असण्याची शक्यता वनविभागाद्वारे वर्तविण्यात आला. फिरताना कदाचित पडणे अथवा वाहनाची धडक अशा कोणत्याही अन्य कारणास्तव जखमी झाले असल्याची शक्यता आहे. या परिसरात वन्यजिवांचा वावर सतत असल्याने या मार्गावर रात्री-अपरात्री कोणीही फिरू नये, तसेच दिवसांदेखील वाहनांच्या वेगावर मर्यादा असावी अशी माहिती वनविभागाद्वारे देण्यात आली.
कोट
कास पठार परिसरात रात्री अपरात्री कोणीही फिरू नये. वन्य पशुपक्ष्यांच्या अधिवासात कोणीही प्रवेश करू नये. वणवा सप्ताह सुरू होत आहे. वणवा लागणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी.
- नीलेश रजपूत,
अतिरिकत वनपाल, वनरक्षक बामणोली.