वारीसाठी दुचाकीवर औषधोपचाराचे किट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 11:54 PM2018-07-03T23:54:34+5:302018-07-03T23:54:39+5:30
सातारा : पालखी तळावर तसेच मुक्कामाच्या ठिकाणी गर्दी व तंबू असलेल्या ठिकाणी रुग्णवाहिका पोहोचणे अवघड होते. त्यासाठी यंदा नव्याने आरोग्यदूत ही संकल्पना जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग राबविणार आहे. प्रत्येक आरोग्यदुताकडे दुचाकी व त्यावर एक वैद्यकीय अधिकारी औषधोपचार किटसह तैनात असणार आहे.
आरोग्यदुताला ओळखण्यासाठी विशिष्ट गणवेश व दुचाकीला स्टिकर लावण्यात येणार आहे. आरोग्यदुताला उपचार व आवश्यक प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे वारकऱ्यांना त्वरित आरोग्यसेवा व उपचार मुक्कामी ठिकाणी मिळणार आहेत. त्यासाठी आरोग्यदुतांच्या २० टीम पालखी मार्गावर कार्यरत राहणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे १३ जुलै रोजी लोणंद येथे आगमन होणार आहे. १७ जुलैपर्यंत सोहळा पंढरपूर दिशेने सातारा जिल्ह्यातून मार्गस्थ होणार आहे.
जिल्ह्यामध्ये लोणंद, तरडगाव, फलटण, बरड असे चार मुक्काम आहेत. वारकºयांना साथीच्या आजारांना सामना करावा लागू नये म्हणून पालखी मार्गावरील पाण्याचे स्त्रोत व पाणीसाठ्यातील पाण्याचे नमुन्यांची अनुजैविक तसेच रासायनिक तपासणी करण्यात आली आहे. ब्लिचिंग पावडरद्वारे विहिरीतील पाण्याचे व टँकरमध्ये भरण्यात येणाºया पाण्याचे शुद्धीकर करण्यात येणार आहे. वारी मार्गावर १२ आरोग्य फिरते पथकाद्वारे उपचार करण्यात येणार आहेत. रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक पुरेशा औषणसाठ्यांसहीत पालखी मार्गावर तैनात करण्यात येणार आहे.
३८५ विहिरींचे होणार शुद्धीकरण
नियमित पाणी शुद्ध करण्यासाठी एक आरोग्य सहायक, दोन आरोग्य सेवक यांचे एक पथक असून, पालखी मार्गावर ३८५ विहिरी ३३ पथकाद्वारे शुद्धीकरण करण्यात येणार आहे. तसेच १८ टँकर भरण्याच्या ठिकाणाचे १८ पथकाद्वारे शुद्धीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे वारकºयांच्या सेवेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करण्यात आली आहेत.