प्रशासनाच्या परवानगीपूर्वीच बाधितांवर खासगी रुग्णालयात उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:40 AM2021-04-16T04:40:46+5:302021-04-16T04:40:46+5:30
शिरवळ : खंडाळा तालुक्यात आरोग्य विभागाचा सावळागोंधळ सुरू आहे. सातारा जिल्हा प्रशासनाकडून परवानगी येण्यापूर्वीच शिरवळ येथील एका खासगी रुग्णालयाने ...
शिरवळ :
खंडाळा तालुक्यात आरोग्य विभागाचा सावळागोंधळ सुरू आहे. सातारा जिल्हा प्रशासनाकडून परवानगी येण्यापूर्वीच शिरवळ येथील एका खासगी रुग्णालयाने कोरोनाबाधितांवर उपचार करण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनच एकाचा मृत्यू झाल्याने अंत्यविधीसाठी मृतदेह कोठे न्यायचा, असा प्रश्न सर्वांनाच पडला. त्यातूनच सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाल्याचा प्रकार उघडकीस आला.
याबाबत समजलेली माहिती अशी की, खंडाळा तालुक्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. कोरोना रुग्णांसह नातेवाईक व प्रशासनालाही सध्या मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत आहे. असे असतानाच शिरवळ येथील एका खासगी रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांवर उपचार व्हावेत, यासाठीचा प्रस्ताव तालुका प्रशासनाने सातारा जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. दरम्यान, सातारा जिल्हा प्रशासनाची मंजुरी मिळण्याअगोदरच एका खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती स्थानिक प्रशासनाला न मिळाल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण, जावळी तालुक्यातील साधारणपणे ४२ वर्षीय कोरोना रुग्णाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे अंत्यविधीसाठी असणाऱ्या नियमांची माहिती नसल्याने व अंत्यविधी कोठे करायचा, हा प्रश्न संबंधित रुग्णालयाच्या प्रशासनाला निर्माण झाला होता. यावेळी रुग्णालय प्रशासनाबरोबर नातेवाइकांचीही मोठ्या प्रमाणात कसरत पाहायला मिळाली.
रुग्णालय प्रशासनाने याबाबतची माहिती उघड झाल्यानंतर सोपस्कार पार पाडत खंडाळा नगर पंचायतीच्या नावाने कागदोपत्राचा फार्स पार पाडला. तसेच संबंधित पत्र नातेवाइकांकडे सुपुर्द करीत एका खासगी रुग्णवाहिकेतून खंडाळा येथे मृतदेह पाठविल्यानंतर सुस्कारा सोडला.
चाैकट :
चालकानेच मृतदेह उचलला...
विशेष म्हणजे कोरोना रुग्णाचा मृतदेह रुग्णवाहिकेच्या चालकासह खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांना पीपीई किट घालून उचलावा लागला. त्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेमध्ये ठेवावा लागला. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.