झाडाला फणसे लगडली शेंड्यापर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 11:09 PM2018-04-26T23:09:26+5:302018-04-26T23:09:26+5:30
बामणोली : वरून काटेरी; पण आतून गोड, मधूर अशा फणसाची झाडे बामणोली भागात फळांनी भरून लागडली आहेत. गोड, मधूर आयुर्वेदिक असे फळ म्हणजे फणस. हे फळ सह्याद्रीच्या पश्चिम डोंगररांगामध्ये घाटमाथ्यावर पाहावयास मिळते.
सातारा जिल्ह्यात पाटण, सातारा, जावळी, महाबळेश्वर व वाई या पश्मिच भागात ही झाडे भरपूर प्रमाणात आहेत. या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी बुंध्यापासून देठापर्यंत या झाडाच्या खोडावर फळे येतात. या फणसाचे कापा व बारका असे दोन प्रकार असतात.
कापा फणसाला सर्वात जास्त मागणी असते. भाजी करण्यासाठी पिकल्यावर खाण्यासाठी बीया-शिजवून व भाजून खाण्यासाठी तसेच साल म्हणजे ढपल्या या गाई, म्हशी, शेळी या जनावरांचे उन्हाळ्यातील एक पौष्टिक खाद्य म्हणून वापरतात.
आजही कोकण व घाटमाथ्या म्हणजे सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये हे फळझाड मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. झाडाचे सर्वांनाच आकर्षण आहे.
पश्चिम भागातील झाडांना लगडलेले हे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी गर्दी होत आहे.