झाड जीपवर कोसळून महिला ठार
By admin | Published: May 23, 2017 11:20 PM2017-05-23T23:20:25+5:302017-05-23T23:20:25+5:30
झाड जीपवर कोसळून महिला ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
तारळे : वादळी वाऱ्यामुळे पिंपरणीचे झाड मोडून पिकअप जीपवर कोसळल्याने नजीकच उभी असलेली एक महिला जागीच ठार झाली. मुरूड, (ता. पाटण) येथे मंगळवारी दुपारी ही दुर्घटना घडली. दरम्यान, सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर जीपवरील झाड हटवून संबंधित महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या दुर्घटनेनंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
सोनुबाई शामराव पिंपळे (वय ५०, रा. मालोशी, ता. पाटण) असे दुर्घटनेत ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुरुड गावाच्या मुख्य चौकात निशिकांत देशमुख यांचे हॉटेल आहे. त्यालगत पुरातन पिंपरणीचे झाड असून, नजीकच जिल्हा परिषद शाळेची भिंत आहे. मंगळवारी दुपारी अचानक वळवाच्या पावसाचे वातावरण तयार झाले. ग्रामस्थ साहित्याची आवराआवर करीत असतानाच वादळी वाऱ्यासह जोरदार त्र आडोशाला गेले. तर सोनुबाई पिंपळे या प्राथमिक शाळेच्या भिंतीलगत उभ्या असलेल्या पिकअप जीपच्या आडोशाला उभ्या राहिल्या. त्याचवेळी देशमुख यांच्या हॉटेलमध्ये दहा ते पंधराजण थांबले होते. अचानक पावसाचा व वाऱ्याचा जोर वाढल्याने पिंपरणीच्या झाडातून मोठा आवाज झाला. क्षणार्धात पिंपरणीचे झाड खाली कोसळले. त्याखाली पिकअप जीप व सोनुबाई पिंपळे दबल्या गेल्या. काही वेळात पावसाने उघडीप दिल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ त्याठिकाणी धावले. त्यावेळी झाडाखाली अडकलेल्या सोनुबाई यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता. ग्रामस्थांनी तातडीने त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, झाडाचा घेर जास्त होता. तसेच ते तोडण्यासाठी पुरेशी साधन सामुग्री उपलब्ध नव्हती. ग्रामस्थांनी मिळेल त्या कुऱ्हाडीने घाव घालून झाड हटविण्यासाठी प्रयत्न केले. तासाभराच्या अथक परिश्रमानंतर ग्रामस्थांनी सोनुबाई यांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच पोलिसही त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. दरम्यान, या दुर्घटनेत पिकअप जीपसह एक दुचाकी व निशिकांत देशमुख यांच्या हॉटेलचे मोठे नुकसान झाले.