निर्माल्यामुळे उभी राहतेय वृक्षसंपदा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:39 AM2021-09-19T04:39:02+5:302021-09-19T04:39:02+5:30
गणपतीला सातारकर मोठ्या श्रध्देने दुर्वा, फुले, पत्री अर्पण करत असतात. याच अर्पण केलेल्या दुर्वा, फुलांच्या निर्माल्याचा सदुपयोग व्हावा, याकरिता ...
गणपतीला सातारकर मोठ्या श्रध्देने दुर्वा, फुले, पत्री अर्पण करत असतात. याच अर्पण केलेल्या दुर्वा, फुलांच्या निर्माल्याचा सदुपयोग व्हावा, याकरिता अनेक सामाजिक संस्थांनी या निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्यासाठी सेंद्रिय खत / गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प सुरु केले आहेत. या निर्माल्यापासून बनवलेल्या खतामुळे ओसाड माळरानावर वृक्षसंपदा उभ्या राहिल्या आहेत.
या जमा झालेल्या निर्माल्यापासून पालिका सेंद्रिय खत / गांडूळ खत तयार करु शकते. साताऱ्यात कऱ्हाड, फलटण, वाई अशी मोठी शहरे आहेत. या शहरांत मोठ्या प्रमाणामध्ये श्रध्देने गणेशोत्सव साजरा केला जातो. जिल्ह्यात विविध सेवाभावी संस्था अनंत चतुर्दशीला विसर्जनादिवशी नद्या, ओढे, विसर्जन तलावांनजीक निर्माल्य दान करण्यासाठी कलश ठेवतात. तसेच कित्येक टन निर्माल्य नदीमध्ये विसर्जित होऊन जलप्रदूषणाचा प्रश्न निर्माण होतो.
हेच निर्माल्य जर एकत्रित केले तर त्यापासून कंपोस्ट खत तयार होते. या खतावर झाडे वाढवू शकता तसेच या खतापासून भाज्याही चांगल्या पध्दतीने येतात. या खतामुळे शेतातील मातीमधील आवश्यक पोषक घटक वाढतात. विविध संस्था सेवाभावी वृत्तीने पुढे येऊन हे काम करत असतात. अनंत चतुर्दशी दिवशी आपले कामधाम सोडून विसर्जनाच्या ठिकाणी हजेरी लावत असतात.
सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशा पध्दतीने निर्माल्यापासू्न खत तयार करण्यासाठी प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या निर्माल्यावर प्रक्रिया करण्यासाठीदेखील हे सेवाभावी वृत्तीचे लोक राबताना पाहायला मिळतात. हेच खत सार्वजनिक जागांवर केलेल्या वृक्षारोपणासाठी वापरतात. या खताच्या जोरावर झाडांची वाढ चांगल्या पध्दतीने होते.
मंडळे हे करु शकतील...
प्रत्येक शहर तसेच गावांमध्ये जास्त प्रमाणात सार्वजनिक मंडळे असतात. या मंडळांचे कार्यकर्तेही उत्स्फूर्तपणे काम करताना दिसतात. युवकांची हीच ऊर्जा जर योग्य कारणासाठी वापरली गेली तर चांगले काम उभे राहू शकते. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विसर्जन स्थळावर निर्माल्य एकत्रित गोळा केले तर त्याचा उपयोग वृक्ष लागवडीसाठी खत म्हणून करता येईल. यंदा तशीही मिरवणुकांवर बंदी आहे, त्यामुळे युवकांनी हा उपक्रम राबवला तर निश्चितपणे गावे हिरवीगार करता येतील.
फोटो नेम : १८ सण्डे नावाने प्रूफला सेव आहे.
१८ कलश नावानेही फोटो सेव आहे,,,योग्य असेल तो वापरावा