गतवर्षीच्या लॉकडाऊनमध्ये लावलेली झाडे बहरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:36 AM2021-05-01T04:36:11+5:302021-05-01T04:36:11+5:30

सातारा : खरंतर, लॉकडाऊन काळात काय करायचे, हा प्रश्न सर्वांनाच असतो. प्रताप कॉलनीतील सभासदांनाही हा प्रश्न सतावत होता. सर्व ...

The trees planted in last year's lockdown blossomed | गतवर्षीच्या लॉकडाऊनमध्ये लावलेली झाडे बहरली

गतवर्षीच्या लॉकडाऊनमध्ये लावलेली झाडे बहरली

Next

सातारा : खरंतर, लॉकडाऊन काळात काय करायचे, हा प्रश्न सर्वांनाच असतो. प्रताप कॉलनीतील सभासदांनाही हा प्रश्न सतावत होता. सर्व जण याबाबत चर्चा करीत असताना खुल्या जागेची स्वच्छता करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर या स्वच्छ जागेत वृक्षारोपण करण्याचे ठरले. लावलेले एकही झाड मरता कामा नये यासाठी सर्वांनी झाडे वाटून घेतली आणि वर्षभर त्यांची काळजी घेतली. सध्या हा परिसर हिरवागार झाला असून, घनदाट सावलीमुळे सर्वांचीच मने सुखावत आहेत.

सध्या या कॉलनीत जाताना दोन्ही बाजूंना घनदाट सावली असलेली झाडे पाहण्यास मिळतात. रस्त्यावरची झाडे जगविणे तसे दिव्यच असते. पण, या कॉलनीतील लोकांनी झाडे दत्तक घेऊन ती जगविण्याचा निश्चय केला होता. त्यामुळे झाडांना कुंपण करणे, त्याच्या पाण्याची व्यवस्था करणे या गोष्टी केल्या. पावसाळ्यात पाणी मिळते; पण हिवाळा आणि उन्हाळ्यात झाडे जगविण्याचा प्रश्न होता. त्यासाठी कॉलनीची एक विहीर आहे. त्यातून सर्व झाडांना ड्रीपद्वारे पाणी देण्याचे नियोजन केले. याचा सर्व खर्च कॉलनीतील लोकांनी केला. त्यामुळे सर्वच्या सर्व झाडे जगली.

सध्या या झाडांपासून गर्द सावली तर मिळतेच त्यासोबतच काही फुले आणि फळांचीही झाडे लावण्यात आल्याने फळे, फुलेही मिळत आहेत. काही औषधी मसाल्याची आणि शोभेचीही झाडे आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सध्या ऑक्सिजन कमी पडू लागल्यानंतर होणारी तडफड पाहता ही झाडे मुक्त ऑक्सिजन देत असल्याचे समाधानही महत्त्वाचे आहे. त्याबरोबरच या भागात सध्या पक्ष्यांची संख्याही वाढली आहे. या झाडांकडे पाहून सध्या कॉलनीतील लोक खूश आहेत. येथून ये - जा करणारेही कॉलनीच्या या उपक्रमाचे कौतुक करीत आहेत. इतरांनीही यापासून प्रेरणा घेऊन असे उपक्रम राबविले तर प्रत्येक कॉलनीत अनेक फळा, फुलांची झाडे आणि ऑक्सिजन पार्क तयार होतील.

फोटो - प्रताप कॉलनीतील रहिवाशांनी वर्षभरापूर्वी लावलेली झाडे सध्या गर्द सावली देत आहेत.

Web Title: The trees planted in last year's lockdown blossomed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.