खंबाटकी घाट बनतोय ट्रेकिंग पॉर्इंट
By admin | Published: January 15, 2017 11:26 PM2017-01-15T23:26:18+5:302017-01-15T23:26:18+5:30
ऐतिहासिक ठिकाण : गिर्यारोहकांची पावले वळू लागली; ‘शिवरायांचा राज्यमार्ग’ म्हणून प्रसिद्ध...
खंडाळा : खंबाटकीचा घाट हा जसा आडवळणी घाटरस्त्यासाठी ओळखला जातो, तसाच अलीकडच्या काळात पर्यटनास्थळ म्हणूनही गणला जाऊ लागला आहे. खंबाटकी घाटातील ऐतिहासिक ठिकाणे आणि वास्तूमुळे गिर्यारोहकांची पावले घाटाकडे वळू लागली आहेत. त्यामुळे खंबाटकी घाट पर्यटकांसाठी ट्रेकिंग पॉर्इंट बनू लागला आहे.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाट हा तसा अवघड वाट आणि त्यामुळे घडणाऱ्या अपघातांमुळेच वारंवार चर्चेत येत होता. मात्र अलीकडच्या काळात या डोंगरकपारीतून असलेला शिवकालीन राजमार्ग, याच मार्गावरील ऐतिहासिक नक्षीदार बांधकामाची विहीर, घाटातील पौराणिक खामटाके आणि खामजाई देवीचे मंदिरे आणि डोंगर माथ्याच्या उंचावर असणारे हरेश्वराचे मंदिर या विविध ठिकाणांमुळे खंबाटकी घाटात पर्यटक, हौशी प्रवासी आणि डोंगरदऱ्यातून नवीन वाटा शोधणारे गिर्यारोहक यांची ये-जा जास्तच वाढली आहे.
खंबाटकी घाटाच्या पायथ्याशी ऐतिहासिक विहीर आहे. तीन कमानींनी बद्ध असलेली आणि घडीव दगडांमध्ये बांधकाम केलेली ही विहीर तशी दुर्लक्षितच होती. मात्र मध्यंतरी काही इतिहास अभ्यासकांनी व शिवप्रेमींनी ही विहीर शोधून त्याची साफसफाई केली. गोसाव्यांची विहीर नावाने ओळखली जाणारी ही विहीर शिवकालीन बांधकामाचा नमुना आहे. तर याच विहिरीजवळून खंबाटकीचा डोंगर चढून जाण्यासाठी एक मार्ग आहे. ‘शिवरायांचा राजमार्ग’ म्हणूनही हा प्रसिद्ध आहे. या मार्गावर ठिकठिकाणी पायऱ्या बांधून डोंगर चढणे सोयीचे बनवले आहे. हा पायऱ्यांचा मार्ग थेट घाटातील खामजाई देवीच्या मंदिराकडे निघतो. डोंगरातील दाट झाडीतून या वाटेने जाणे म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच ठरते.
घाटाच्या माध्यावर असणाऱ्या खामजाई मंदिराला जुना इतिहास आहे. त्याशेजारी असणारे खामटाके हे पुराणकाळातील खोदकाम केलेला पाण्याचा जिवंत झराच आहे. शिवकाळातही या देवीच्या उत्सवासाठी शिवरायांनी वर्षासन लावून दिल्याच्या तत्कालीन कागदपत्रांतील उल्लेखावरून दिसून येते.
या मंदिराच्या दर्शनानंतर डोंगराच्या उंच माथ्यावर असणाऱ्या हरेश्वराच्या मंदिराकडे जाणारी पायवाट आहे. तेथे जाणे हा अनोखा अनुभव असतो.
त्यामुळे तरुण पर्यटकांसाठी खंबाटकी घाट हे एक आव्हान बनले आहे. या डोंगरघाटातील ही ठिकाणे पाहण्यासठी आजपर्यंत अनेकांची पावले येथे उमटली आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात सुटीच्या दिवसात येथे गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. ट्रेकर्ससाठी हे नवोदित ठिकाण मन वेधून घेणारे ठरत आहे. (प्रतिनिधी)