माण तालुक्यातील सीताफळ लागवडीकडे कल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:38 AM2021-04-10T04:38:29+5:302021-04-10T04:38:29+5:30
कुकुडवाड: दुष्काळी भागात फळपिकातून अधिक उत्पन्न मिळवावे़. आशाप्रकारे दुष्काळी पट्ट्यात कमीत कमी पाण्यामध्ये सीताफळ लागवड करून उत्पादन घेऊ शकतात. ...
कुकुडवाड: दुष्काळी भागात फळपिकातून अधिक उत्पन्न मिळवावे़. आशाप्रकारे दुष्काळी पट्ट्यात कमीत कमी पाण्यामध्ये सीताफळ लागवड करून उत्पादन घेऊ शकतात. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्याला आर्थिक संकटात आधार देण्याचे काम विविध प्रकारचे फळझाडे करत असतात. त्यामध्ये सीताफळ, डाळिंब, आवळा, बोर यांसारख्या फळबाग लागवड केली जात आहे. माण तालुक्यातील तरुण शेतकरीवर्ग फळबाग लागवडीच्या दिशेने जात असल्याचे चित्र दिसत आहे.
माण तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी दुष्काळी परिस्थिती कायम असताना दिसत आहे. माण तालुका कायम दुष्काळी असला तरी तालुक्यातील तरुण शेतकरी दुष्काळाला खचून न जाता कष्ट करण्याची हिंमत व चिकाटी कायम ठेवत असतात. सुशिक्षित बेरोजगारी वाढत असून, नोकरीचा कुठे पत्ता नाही. दुष्काळी पट्टा असल्यामुळे पाण्याची मोठी कमतरता भासत असते. अन्य पिकाच्या उत्पादनासाठी लागणारे महागडी बियाणे, रासायनिक खते व मजुरांची कमतरता या सर्वांचा खर्चाचा विचार करता शेती शेतकऱ्यांना परवडत नाही. म्हणून तालुक्यातील बऱ्याच तरुण शेतकऱ्यांचा कल फळबाग लागवडीकडे वाढत आहे. कमीत कमी पाण्यात पिकातून उत्पादन घेण्यासाठी सीताफळ, डाळिंब लागवड केली जाते. शेतीतून एक आर्थिक उत्पन्न शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे, या दृष्टीने शेतकऱ्यांना फळबागा लागवडीकडे वळले पाहिजे म्हणून सीताफळ लागवडीसाठी प्रेरित करण्यात आले. सीताफळामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत.
फेब्रुवारी ते जून या कालावधीत पाणी नसले तरी किंवा थोड्याफार प्रमाणात संपूर्ण झाडे जगतात. यामुळे गेल्या वर्षी चार हजार झाडे लावण्यात आली. तरुण शेतकरी फळबाग लागवडीकडे आकर्षित झाले आहेत. हळूहळू फळबाग लागवडीचे महत्त्व समजत जाईल. त्याच प्रमाणात उत्पादन वाढून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास निश्चित मदत होईल, असा विश्वास तरुण शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे.
कोट:-
दुष्काळी भागातील कमी पाण्यात व कमी खर्चात हमखास उत्पादन देणारे पीक म्हणजे सीताफळ असून, तरुण शेतकरी वर्गाने शेतीमध्ये लक्ष घालून सीताफळ लागवडीसाठी प्रयत्न केले पाहिजेत.
-दादासो काटकर,सीताफळ उत्पादक शेतकरी, कुकुडवाड, ता. माण
फोटो आहे..०९कुकुडवाड