फलटणला तिरंगी लढतीचे चित्र

By admin | Published: November 5, 2016 12:18 AM2016-11-05T00:18:11+5:302016-11-05T01:05:35+5:30

पालिका निवडणूक : प्रतिष्ठेच्या लढाईसाठी राष्ट्रवादी, कॉँग्रेस, शिवसेनेची मोर्चेबांधणी

Tri-color picture to Phaltan | फलटणला तिरंगी लढतीचे चित्र

फलटणला तिरंगी लढतीचे चित्र

Next

फलटण : फलटण नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज छाननीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिरंगी लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी व राष्ट्रीय कॉँग्रेसला समर्थ तिसरा पर्याय भाजपा-शिवसेना निर्माण करणार की भाजपा-शिवसेनेमुळे होणाऱ्या मतदान विभागणीचा फायदा कोणत्या पक्षाला होणार याची समीकरणे जुळविण्यात नेतेमंडळी व्यस्त आहेत. फलटण नगरपालिका निवडणूक यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी मनावर घेत प्रतिष्ठेची बनविली आहे. राष्ट्रीय कॉँग्रेस व भाजपाच्या युवा नेतृत्वांनी निवडणुकीची सूत्रे हाती घेतल्याने निवडणूक त्यांनी प्रतिष्ठेची केली आहे. फलटण नगरपालिकेवर गेली २५ वर्षे राज्य विधान परिषधेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांंची एकहाती सत्ता असून, याही निवडणुकीत सत्ता कायम राखण्यावर रामराजेंचा भर असणार आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे मोठ्या संख्येने उमेदवारांनी मागणी केली होती. इच्छुकांच्या प्रचंड संख्येतून नवे, जुने चेहऱ्यांचे मिश्रण करीत रामराजेंनी राष्ट्रवादीचे २५ उमेदवार निवडले आहेत. नगराध्यक्षपदासाठी रामराजेंनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी नगरसेवक मिलिंद नेवसे यांच्या पत्नी नीता नेवसे यांना उमेदवारी देत नवा चेहरा दिला आहे. राष्ट्रीय कॉँग्रेसची धुरा कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी हाती घेत स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे, महेंद्र बेडके यांना मदतीला घेत राष्ट्रीय कॉँग्रेसचे पॅनेल उभे केले आहे. एकास एक उमेदवारी देण्यासाठी भाजपामधील बंडखोर रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), स्वाभिमानी पक्ष यांना बरोबर घेत त्यांनाही उमेदवारी दिली आहे. नगराध्यक्षपदासाठी सुवर्णा पवार या उच्चशिक्षित महिलेला उमेदवारी देत नवा चेहरा समोर आणताना कुणबी मराठा कार्ड त्यांनी वापरले आहे. भाजपाने मोहिनी हेंद्रे नगराध्यपदासाठी नवीन चेहरा दिला आहे. राष्ट्रवादी, राष्ट्रीय कॉँग्रेस व भाजपा-सेना सक्षमपणे निवडणूक रिंगणात उतरणार असून, स्टार मंडळींना प्रचार सभेत उतरविणार असल्याने तिरंगी लढत कोणाला मारक ठरणार आणि कोणाला तारक ठरणार याचे समीकरण जुळविण्यात नेमेमंडळी सध्या व्यस्त आहेत. तर जनतेसाठीही तिरंगी लढतीबाबात उत्सुकता लागून राहिली आहे. ॅनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन्ही पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली असून अंतर्गत प्रचार तसेच गुप्त बैठकांचा जोर वाढला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Tri-color picture to Phaltan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.