आदिवासी भागातील मामाच्या गावाची नाळ जपली
By Admin | Published: September 6, 2016 01:39 AM2016-09-06T01:39:32+5:302016-09-06T01:39:45+5:30
शाळेला संगणक भेट : उंब्रज येथील तरुणानं दाखविले इगतपुरी भागात दातृत्व - गुड न्यूज
उंब्रज : ‘झूक झूक झूक झूक आगगाडी, धुरांच्या रेषा हवेत सोडी, पळती झाडे पाहू या, मामाच्या गावाला जाऊ या.’ हे बालगीत गात, ऐकत आपण लहानाचे मोठे झालो. सुटीत मामाच्या गावी, आजोळी घालवलेले क्षण आठवले तरी आपल्या बालपणाचा चित्रपट नजरेसमोर उभा राहतो. असाच उंब्रजमधील एका भाच्याने आजोळचे नाते जपत मामाच्या गावातील, भागातील शाळेला तीन संगणक भेट दिले आहेत. मामाचे गाव आहे इगतपुरी या आदिवासी तालुक्यातील ‘समनेर’ हे आदिवासी गाव.
येथील नंदूसिंग हजारे हे युवा शेतकरी. शेतीत काबाडकष्ट करत आपली प्रगती करत असताना नंदूसिंग हजारे हे ‘जाणता राजा प्रतिष्ठान’च्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत असतात. याच प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी आदिवासी भागातील मामाच्या गावाला तीन संगणक भेट देण्याचा अनोखा उपक्रम राबविला. आदिवासी भाग हा अजूनही अनेक नवनवीन साधनांपासून वंचित आहे. अशा भागात संगणक विद्यार्थ्यांना बघण्यासाठी मिळणे ही दुर्मीळ; पण अशाच शाळेतील विद्यार्थ्यांना तीन संगणक भेट देऊन नंदूसिंग हजारे यांनी या आदिवासी विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाची संधी दिलीच; पण सामाजिक दरी कमी करण्याचे काम केले आहे. आता ही मुले जगातील सर्व घडामोडी ‘माउस’ वर क्लिक करून माहिती करून घेणार आहेत. (प्रतिनिधी)
जाणता राजा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजूंना मदत
मामाच्या गावाला संगणक देण्याबरोबर ‘जाणता राजा प्रतिष्ठान’च्या माध्यमातून नंदूसिंग हजारे यांनी उंब्रज येथील जिल्हा परिषदेच्या मराठी मुलींच्या शाळेलाही दोन संगणक भेट दिले आहेत. हे संगणक भेट देताना ‘जाणता राजा प्रतिष्ठान’चे किशोर हजारे, दीपक जाधव, सुनील हजारे, संतोष जाधव, प्रकाश शेजवळ, विनोद गाडे, नाना शेजवळ, संजय निगडे, माउली धुमाळ हे कार्यकर्ते उपस्थित होते.
आमचा भाचा लहान होता तेव्हा शाळेला सुटी लागली की आमच्याकडे येत होता. आदिवासी भागात गाव असल्यामुळे नंदूला सर्व परिस्थितीची जाणीव होती. यामुळेच त्याने येथील शाळेला संगणक भेट दिले. या भेटीमुळे आम्हाला ही आमच्या भाच्याबाबत अभिमान वाटतोय. आम्ही ही गावात अभिमानाने सांगतो. संगणक कोणी दिले तर माझ्या भाच्याने दिले.
- जानकीराम परदेशी, मामा
आम्ही ‘जाणता राजा प्रतिष्ठान’तर्फे विविध उपक्रम राबवत असतो; पण हे उपक्रम उंब्रज व परिसरापुरते मर्यादित असतात. माझे आजोळ हे आदिवासी भागातील तेथील मुलांना ही शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. आर्थिकदृष्ट्या ही मागास. मी लहानपणी शाळेला सुटी लागली की आजोळी जात होतो यामुळे सर्व परिस्थिती मला माहिती होती. म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. मामाच्या गावाला संगणक भेट दिले.
- नंदूसिंग हजारे,
अध्यक्ष, जाणता राजा प्रतिष्ठान, उंब्रज