कराडात भाजपची तिरंगा बाईक रॅली, उदंड प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 04:03 PM2022-08-10T16:03:03+5:302022-08-10T17:56:09+5:30
धैर्यशील कदम हे जयकुमार गोरे यांच्या गाडीतून पुढे निघून गेले. याचीही चर्चा रॅली संपल्यावर सुरू होती.
प्रमोद सुकरे
कराड: येथील भारतीय जनता पार्टी कराड शहर, दक्षिण, उत्तरच्यावतीने बुधवारी भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रिमांड होम पासून हुतात्मा स्मारकात अभिवादन करून दत्त चौक मार्गे आझाद चौक, नेहरू चौक, कमानी मारुती, पांढरा मारुती, विजय चौक, दत्त चौक, मार्गे रॅली काढण्यात आली. कार्वे नाका येथे रॅलीचा समारोप झाला.
रॅलीच्या अग्रभागी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, प्रदेश सचिव डॉ. अतुल भोसले यांचा सहभाग होता. रॅलीत मुकुंद चरेगावकर अँड.भरत पाटील, रामकृष्ण वेताळ,सागर शिवदास, कराड दक्षिणचे अध्यक्ष पैलवान धनाजी पाटील, उत्तरचे अध्यक्ष महेश जाधव, शहर अध्यक्ष एकनाथ बागडी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आमदार जयकुमार गोरे म्हणाले, स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने 'हर घर तिरंगा' हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतला आहे. त्याचेच प्रबोधन व्हावे; ज्यांनी प्राणांची आहुती दिली त्यांचा सन्मान व्हावा. ज्यांनी बलिदान दिले त्यांचे स्मरण व्हावे या हेतूने आज कराडमध्ये ही बाईक रॅली काढण्यात आली आहे. याला प्रतिसाद चांगला मिळाला आहे. प्रत्येकाने आपल्या घरावर झेंडा फडकवून यात सहभागी व्हावे.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी त्याग केला. त्या त्यागाचे स्मरण करण्यासाठी 'हर घर तिरंगा' हे अभियान आहे. त्या त्यागातून नव्या पिढीने प्रेरणा घ्यावी, आपला देश बलशाली बनविण्याचा निर्धार करावा ही अपेक्षा आहे.
धैर्यशील कदमांची चर्चा!
कराड उत्तरचे युवक नेते, वर्धन ऍग्रोचे प्रमुख धैर्यशील कदम यांनीही या तिरंगा बाईक रॅलीच्या समारोपप्रसंगी हजेरी लावली. त्यानंतर धैर्यशील कदम हे जयकुमार गोरे यांच्या गाडीतून पुढे निघून गेले. याचीही चर्चा रॅली संपल्यावर सुरू होती.