Satara: मित्राच्या वडिलांना पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न, मुख्य संशयितासह चार जण ताब्यात

By दत्ता यादव | Published: June 12, 2024 03:33 PM2024-06-12T15:33:31+5:302024-06-12T15:34:10+5:30

सातारा : मित्रासोबत झालेल्या भांडणातून त्याच्या वडिलांनाच पेट्रोल टाकून जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार पाटखळ, ता. सातारा येथे मंगळवारी रात्री साडेदहा वाजता ...

Tried to kill friend's father by dousing him with petrol, four arrested including main suspect in Satara | Satara: मित्राच्या वडिलांना पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न, मुख्य संशयितासह चार जण ताब्यात

Satara: मित्राच्या वडिलांना पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न, मुख्य संशयितासह चार जण ताब्यात

सातारा : मित्रासोबत झालेल्या भांडणातून त्याच्या वडिलांनाच पेट्रोल टाकून जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार पाटखळ, ता. सातारा येथे मंगळवारी रात्री साडेदहा वाजता घडला. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयितासह चाैघांना ताब्यात घेतले आहे.
अनिल मधुकर शिंदे (वय ४४, रा. पाटखळ, ता. सातारा), असे जखमीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अनिल शिंदे यांचा मुलगा प्रज्वल आणि संशयित तरुण या दोघांची मैत्री होती. त्यामुळे त्याचे प्रज्वलच्या घरी येणे-जाणे असायचे. वर्षभरापूर्वी प्रज्वलचे लग्न झाले. त्यावेळी लग्नामध्ये धक्का लागल्याच्या कारणातून संशयित तरुणाची वादावादी झाली होती. त्यामुळे दोघा मित्रांमध्ये बोलणे नव्हते. 

मात्र, पूर्वीचा राग मनात धरून संशयित तरुण हा तीन मित्रांना सोबत मंगळवारी रात्री शिंदे यांच्या घरी गेला. त्यावेळी घरात प्रज्वलची आई उज्ज्वला शिंदे या एकट्याच होत्या. तर प्रज्वल पुण्यात आणि वडील बाहेर गेले होते. प्रज्वलला आता फोन करून माफी मागायला सांगा, असं त्याच्या आईला तो सांगत होता. आईने हो, सांगते. तुम्ही दोघे भांडू नका, असं सांगितले. त्यानंतर तेथून ते सर्व निघून गेले.

परंतु काही वेळानंतर प्रज्वलचे वडील अनिल शिंदे हे दुचाकीवरून घरी आले. याचवेळी संशयित तरुणाने पाठीमागून येऊन सोबत आणलेली पेट्रोलची बाटली त्यांच्या अंगावर ओतली. त्यानंतर लायटरने आग लावली. अनिल शिंदे आरडाओरड करत असल्याचे पाहून त्यांच्या पत्नी धावत घरातून बाहेर आल्या. क्षणाचाही विलंब न करता अनिल शिंदे यांनी अशा अवस्थेतही बोअरचे बटण सुरू केले. स्वत: पाण्याचे फवारे अंगावर घेऊन पेटते शरीर विझविले. या प्रकारानंतर संबंधित संशयित तेथून पसार झाले. जखमी शिंदे यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये ते ५६ टक्के भाजून ते जखमी झाले आहेत.

सिव्हिलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला नेण्यात आले.
दरम्यान, या घटनेनंतर सातारा तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नीलेश तांबे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नेमका काय प्रकार झालाय, हे समजून घेऊन त्यांनी तत्काळ आरोपींना अटक करण्याची व्यूहरचना आखली. मुख्य संशयितासह चाैघांना मध्यरात्री ताब्यात घेतले. या गुन्ह्यात नेमका कोणाकोणाचा सहभाग आहे, हे तपासून त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

एवढा राग मनात असेल, याची कल्पनाही नव्हती..

माझ्या मुलाची आणि त्याची चांगली मैत्री होती. तो आमच्या घरात सतत यायचा. जेवणही करायचा; पण दोघांमध्ये किरकोळ मतभेद झाल्यानंतर तो माझ्या मुलाचा एवढा राग मनात ठेवून असेल, याची कल्पनाही नव्हती. पूर्ण तयारीनिशी तो पेट्रोल घेऊन आला होता. असे उज्ज्वला शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Tried to kill friend's father by dousing him with petrol, four arrested including main suspect in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.