टाळ मृदंगासह त्रिवेणी संमेलनाने गजबजली उंब्रजनगरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 01:41 PM2019-01-18T13:41:23+5:302019-01-18T13:53:01+5:30
टाळ मृदंगावरील वारकरी समुदाय....लेझीमवर ताल धरणारे विद्यार्थी आणि स्थानिक कलाकारांनी सादर केलेले लोककला अशा भारावलेल्या वातावरणात उंब्रज, ता. कऱ्हाड येथील तिसऱ्या त्रिवेणी साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीद्वारे सुरुवात झाली.
उंब्रज : छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साईबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, सावित्रीबाई फुले यांच्या वेशातील मंडळीनी संस्कृती दर्शन ....चौकाचौकातील रांगोळ्यांच्या पायघड्या .....महिलांनी धरलेला फेर..... टाळ मृदंगावरील वारकरी समुदाय....लेझीमवर ताल धरणारे विद्यार्थी आणि स्थानिक कलाकारांनी सादर केलेले लोककला अशा भारावलेल्या वातावरणात उंब्रज, ता. कऱ्हाड येथील तिसऱ्या त्रिवेणी साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीद्वारे सुरुवात झाली.
उंब्रज, ता. कऱ्हाड येथील त्रिवेणी साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी ग्रंथदिंडीने मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. साहित्य संमेलनाचे संयोजक, नागरिक यासह महिला वर्ग यांनी ग्रंथदिंडीचे पूजन केले. यावेळी शुक्रवारी सकाळी महात्मा गांधी विद्यालयात नागरिक, महिला, युवक, सर्व विद्यार्थी एकत्रित जमा झाले.
ढोलताशाच्या गजरात मिरवणुकीस प्रारंभ झाला. प्रारंभी तसेच विविध वेशभूषा केलेल्या लहान थोरांपासून शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभाग असलेल्या आकर्षक आणि जल्लोषाने लोकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
मुलींचा सहभाग तर विशेष उल्लेखनीय होता. नऊवारी साडी, नाकात नथ अशा पारंपरिक वेशात महिलावर्गाने घोड्यावर स्वार होऊन ग्रंथदिंडीची शोभा वाढवली. विद्यालयातून ग्रंथदिंडीस सुरुवात होऊन दिंडी सुरभी चौकमार्गे, चोरे रोड, बसस्थानक परिसर करून माणिक चौकमार्गे, भैरवनाथ मंदिराकडून ग्रामपंचायत कार्यालय रोडने बाजारपेठेतील साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपात आली.
यावेळी नागरिक, युवक, महिलांनी दुतर्फा उभे राहून दिंडीचे स्वागत केले. यावेळी युवतींनी बाजारपेठेत लेझीम पथकाचा कार्यक्रम सादर केला. अनेक ठिकाणी दिंडीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
या दिंडीत वैशिष्ट्यपूर्ण ठरली घोड्यावर स्वार झालेले शिवाजी महाराज आणि जिजामाता यांच्या वेशभूषा केलेले युवक व युवती. तसेच अनेक देखाव्यांचा समावेश यामध्ये होता. यामध्ये साहित्यिक, कवी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.