ट्रॉलीला लाल पट्टी.. अपघाताला सुटी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 11:18 PM2018-01-02T23:18:15+5:302018-01-02T23:24:33+5:30
सातारा : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असून, रात्रीच्यावेळी ऊस वाहतूक करणाºया वाहनांच्या अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे अपघात टाळण्यासाठी ‘लोकमत’च्या पुढाकाराने वात्सल्य सामाजिक संस्था व धर्मवीर युवा मंच यांच्या सहकार्यातून शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात ऊस वाहतूक करणाºया वाहनांना रेडियम बसविण्याच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
सध्या जिल्ह्यातील उसाचा गळीत हंगाम जोरात सुरू आहे. सर्व कारखान्यांत ऊस गाळपासाठी ट्रक, ट्रॅक्टर व बैलगाडी अशी हजारो
वाहने ऊस भरून धावत आहेत. जिल्ह्यात आज सहकारी व खासगी अशा एकूण १५ साखर कारखान्यांमध्ये गाळप सुरू असून, त्यासाठी पाच हजारांहून अधिक वाहनांतून ऊस वाहतूक केली जाते. रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक करण्यात येते. ही उसाची वाहतूक धोकादायक ठरत असते. कारण अनेक ऊस वाहतूक वाहनांना रिफ्लेक्टर नसल्यामुळे रात्रीच्या वेळी पाठीमागून वाहने धडकतात. त्यामुळे अपघात होऊन मृत व जखमींची संख्या वाढत आहे.
अजिंक्यतारा कारखाना परिसरात मंगळवारी सकाळी ‘लोकमत’च्या पुढाकाराने वात्सल्य सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पवार, उपाध्यक्ष रणजित सावंत, सचिव प्रवीण कासकर, अशोक शिंदे, सोमनाथ शिराळ, मंगेश जाधव, जाफरखान मुल्ला, गणपत शिंदे, केशव सांभारे, रणजित सावंत, विकास बाबर, प्रकाश जाधव, धर्मवीर युवा मंचचे अध्यक्ष प्रशांत नलवडे, प्रसन्ना जाधव, सत्यम कदम, सागर फडतरे, आकाश घाड़गे, अतुल घाड़गे, शुभम कदम व सहकाºयांनी ऊस वाहतूक करणाºया ट्रॅक्टर चालकांना थांबवून ट्रॉलीच्या पाठीमागील बाजूस व अॅक्सलला रिफ्लेक्टर व रेडियम लावले. त्यावेळी अनेक ट्रॅक्टर व ट्रॉलीवर रेडियम नसल्याने निदर्शनास आले. रेडियमपट्टी लावल्यानंतर
ट्रॅक्टर चालकांनी ‘लोकमत’च्या उपक्रमाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.
साताºयातील वात्सल्य सामाजिक सेवाभावी संस्था, धर्मवीर युवा मंचने या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यासाठी या संस्थांनी ऊस वाहतूक वाहनांसाठी रेडियम पुरविणे व लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या माध्यमातून ऊस वाहतूक करणाºया वाहनांच्या अॅक्सलला रेडियम लावण्यात येणार आहे.
अपघात रोखण्यास होणार मदत
ऊस तोड मजुरांनी दिवसभर तोडलेला ऊस सायंकाळी ट्रक किंवा ट्रॉलीमध्ये भरला जातो. त्यानंतर ऊस वाहतूकदार सायंकाळी उसाच्या फडातून कारखान्याकडे उसाची वाहतूक केली जाते. उसाचा ओव्हरलोड असल्याने कायम सावकाश चालवावी लागतात. रेडियम नसल्याने पाठीमागून येणारी वाहने ट्रॉलीला धडकतात. त्यामुळे झालेल्या अपघातास ऊस वाहतूक करणाºया चालकास जबाबदार धरले जाते. रेडियम लावल्याने काही प्रमाणात अपघात रोखण्यास मदत होणार आहे.
सहभागी होण्याचे आवाहन
देगाव फाटा येथील जगदंब क्रिएशन आणि पी. के. सेल्स येथेही वाहनधारकांसाठी रेडियम मोफत देण्याची व्यवस्था या संस्थांनी केली आहे. या संस्थांच्या माध्यमातून अधिकाधिक वाहनांना रेडियम लावण्याचा प्रयत्न आहे. ‘लोकमत’च्या पुढाकारातून व संस्थांच्या सहकार्यातून ही मोहीम सुरू करण्यात आली असून यामध्ये विविध सामाजिक संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.