फौजीमुळे सापडले चोरटे!
By admin | Published: May 22, 2014 12:14 AM2014-05-22T00:14:41+5:302014-05-22T00:20:34+5:30
बारा वाहने जप्त : वाहने चोरणारी टोळी गजाआड
सातारा : गेल्या काही महिन्यांपासून शहर आणि परिसरातून जबरी चोरी आणि वाहन चोरी करणार्या टोळीचा पर्दाफाश झाला असून, ही टोळी सैन्य दलातील एका जवानाच्या प्रतिकारामुळे पोलिसांच्या हाती लागली, अशी माहिती पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. अकीबजावेद कासमसाहेब नंदगळकर ऊर्फ अकीब गुलाब शेख ऊर्फ अकीब गुलाब बागवान (वय १९ रा. निसर्ग कॉलनी अपार्टमेंट करंजे, सातारा), हर्षद राजू बागवान (वय २१ रा. यादोगोपाळ पेठ, सातारा), असिफ शमशुद्दीन पठाण (वय १९, रा. शनिवार पेठ, सातारा), आतिक हसन शेख (वय १९, रा. बुधवार पेठ, सातारा), मोहसीन ऊर्फ गैस वल्ली शेख (वय १९, रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांंची नावे आहेत. टोळीत या पाचजणांसह दोन अल्पवयीन मुलांचाही सहभाग असून त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. ही टोळी शहर परिसरातून वाहने चोरायची. त्यानंतर रात्री त्याच वाहनातून एकट्या-दुकट्या प्रवाशाला ‘लिफ्ट’ देण्याचा बहाणा करून गाडीत घ्यायचे. लूटमार करून नंतर त्यांना सोडून द्यायचे. असा त्यांचा उद्योग नेहमी सुरू असायचा. मात्र, पोलिसांच्या हाती ही टोळी सापडत नव्हती. दि. १३ मे रोजी रात्री सैन्यदलातील जवान संजय साळुंखे (रा. देगाव, ता. सातारा) यांनाही अशाच प्रकारे लुटण्याचा या टोळीचा बेत होता. परंतु साळुंखे यांच्या प्रतिकारामुळे त्यांचा डाव फसला आणि एका चोरट्याला त्यांनी पकडले. त्यामुळे या टोळीची इत्थंभूत माहिती पोलिसांना समजली. त्यानंतर टोळीतील एकेका चोरट्याला पोलिसांनी काही तासांतच अटक केली. विशेष म्हणजे या टोळीने केवळ दोन महिन्यांत तब्बल १९ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. आणखी बरेच गुन्हे या टोळीकडून उघडकीस येणार आहेत. १२ वाहनांसह ११ मोबाइल, १० हजारांची रोकड असा सुमारे ५ लाख ६३ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक रवींद्र मुठाणे, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहायक फौजदार दिलीप अहिरे, भीमराव चव्हाण, हवालदार बशीर मुलाणी, नीलेश काटकर, किशोर वायदंडे, विशाल सर्वगौड, ज्योतिराम बर्गे, विशाल मोरे, राजू कांबळे, प्रमोद सावंत आदी कर्मचार्यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)