वाढेफाट्यावर पुन्हा ट्रकचालकाला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:30 AM2021-04-29T04:30:48+5:302021-04-29T04:30:48+5:30
सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाढे फाट्याच्या अलीकडे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका ट्रकचालकाला दुचाकीवरून आलेल्या तिघांनी अडवून त्याचा मोबाईल ...
सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाढे फाट्याच्या अलीकडे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका ट्रकचालकाला दुचाकीवरून आलेल्या तिघांनी अडवून त्याचा मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवार, दि. २५ रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास वाढेफाटा उड्डाण पूलावर ट्रकचालक आणि क्लिनरला मारहाण करून लुटले होते. हा गुन्ह सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने काही तासांतच उघडकीस आणून दोघांना अटक तर एकाला ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या दोन्ही गुन्ह्यातील संशयित एकच आहेत की अन्य आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, गौतम चपंतराव विणकरे (वय ३८, रा. वाळूंज, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद. मूळ रा. चालगणी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) हे शनिवार, दि. २४ रोजी ट्रकमधून (एमएच २८ - बीबी ४६४९) माल भरून कोल्हापूरहून औरंगाबादला निघाले होते. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ते पुणे-बंगळूर महामार्गावरील कोल्हापूर ते पुणे सेवा रस्त्यावर आले असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्या ट्रकला दुचाकी आडवी मारली आणि ट्रक थांबवला. यावेळी तिघांनी ट्रकच्या केबिनचा दरवाजा जबरदस्तीने उघडून देण्यासाठी पैसे मागितले. या तिघांनाही दोनवेळा वीस रुपये असे चाळीस रुपये दिले. मात्र, त्यांनी परत शंभर रुपये मागितले असता ते देण्यास टाळाटाळ करण्यात आली. यावेळी एकाने ट्रकचालकाच्या पोटाला फरशीचा तुकडा तर दुसऱ्याने चाकूचा धाक दाखवत त्याच्या वरच्या खिशात असणारा पाच हजार रुपये किमतीचा मोबाइल जबरदस्तीने चोरून नेला. याप्रकरणी गौतम विणकरे यांनी मंगळवार, दि. २७ रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर तीन अनोळखींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी भेट दिली आणि पाहणी केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम हे करत आहेत.