झाडाचा बुंधा ठरला रक्षणकर्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:41 AM2021-07-30T04:41:08+5:302021-07-30T04:41:08+5:30
सातारा : पाऊस वाढला तसं आम्हाला धडकी भरली, शेतातनं पोरं अजून कशी आली नाहीत, हे बघायला मी बाहेर गेलो ...
सातारा : पाऊस वाढला तसं आम्हाला धडकी भरली, शेतातनं पोरं अजून कशी आली नाहीत, हे बघायला मी बाहेर गेलो आणि ओढ्याच्या शेजारून माती गाळ, लाकूड यांचा भलामोठा लोंढा माझ्याकडे आला. धावण्याची परिस्थिती नव्हती. काही विचार करायच्या आतच मी त्या लोंढ्यात ओढला गेलो अन् नाकातोंडासह डोळ्यांतही माती गेल्याने पुढचं काहीच दिसत नव्हतं. हाताला जे लागेल ते धरायचं आणि त्याच्या आधारावर आजूबाजूला काही आसरा मिळातोय का हे शोधत होतो. पाण्याच्या या लाटेनं तीन किलोमीटरपर्यंत नेलं. एका ठिकाणी झाडाचा बुंधा सापडला, त्यालाच घट्ट धरलं तोच माझा रक्षणकर्ता ठरला. चार तासांच्या झुंजीनंतर रात्री बारा वाजता मला तहसीलदारांनी दवाखान्यात दाखल केलं... कोसळणाऱ्या पावसाचं रुद्ररूप अनुभवलेले ६७ वर्षीय राजाराम जाधव सांगत होते.
मृत्यूशी झालेल्या सामन्याविषयी. वाई तालुक्यातील दुर्गम जोर भागातही पावसाने मोठे नुकसान केले आहे. पावसाच्या प्रकोपानंतर वाई तालुक्यातील काही ही गावं अद्याप संपर्कहीन आहेत. २२ तारेखला झालेल्या धुवाधार पावसातून राजाराम जाधव संघर्ष करून वाचले आहेत. सध्या त्यांच्यावर वाईतील मिशन हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अतिवृष्टीमुळे वाहून आलेल्या लोंढ्यात वाहून गेलेले जाधव कसेबसे बचावले असले तरी तीन बरकड्या, हात मोडल्याने ते जायबंद आहेत.
आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलेल्या या पावसाचं वर्णन अजब पाऊस म्हणून त्यांनी केलं. जाधव म्हणाले, या कोविडमुळं पोरांची नोकरी गेली. मुंबईत हाताला काम नाही, तर शेतात राबून जरा घरचं पिकवू असा विचार करून पुतण्यानं महिनाभरापासून शेतात काम करणं सुरू केलं. सकाळपासूनच पाऊस लागून राहिल्यानं संध्याकाळी चारच्या सुमारास दोघं भाऊ भात शेतात किती पाणी शिरलंय ते बघायला गेले. घरात ८९ वर्षांची आई आहे. तिनं ‘हा पाऊस वंगाळ वाटतूय’ असं वाक्य उच्चारलं आणि माझ्याही मनात कालवाकालव सुरू झाली. पाच-सात मिनिटं गेली आणि मीच कोसळत्या पावसात वाहत्या पाण्याचा अंदाज घेत पोरांना शोधायला गेलो. पोरांना हाळी दिली, पण पावसाचे आणि ओढ्यातून वाहणाऱ्या पाण्याचा आवाज इतका मोठा होता की त्यांच्यापर्यंत माझा आवाज गेलाच नाही. जरा पुढं जाऊ म्हणून पाय उचलला तर ओढ्याच्या पाण्यानं मला अक्षरश: ओढूनच नेलं.
डोंगरमथ्यावरून येणारी माती, दगडं, झाडं, घाण, सगळं म्हणजे सगळं या काल्यात दिसत होतं. पाण्याचा हा लोंढा इतका मोठा होता की त्यात वाचणं मुश्कील होतं. कृतीचा विचार करायच्या आत मी चिखलाच्या राड्यात होतो आणि काही कळायच्या आतच माझ्या नाकातोंडात माती गेली. लुकलुक करून डोळ्यांनी काही बघावं म्हटलं तर त्यातही माती गेली. हातांनी डोळे चोळावेत तर त्यालाही माती लागलेली. तब्बल चार तास मातीच्या या राड्यात माझी आंधळी कोशिंबीर सुरू होती. हाताला कुठलीही वस्तू लागली तर ती आपल्याला वाचवू शकेल का, हा एकच विचार डोक्यात होता. डोळ्यात माती गेल्याने पुढचं काही दिसत नव्हतं, पण हार मानायची नाही असं ठरवलं आणि हातपाय हलवत राहिलो. पाण्याचा लोंढा नेत होता आणि शरिरावर निव्वळ जखमा होत होत्या. तब्बल चार तास परिस्तीशी झगडा दिल्यानंतर मला झाडाचा बुंधा सापडला ज्याच्या आधाराने मी बाहेर पडू शकलो. बाहेर येऊन चालायचा प्रयत्न केला, पण कमरेखालचा भाग उचलेना हे लक्षात आलं. मग नेनत्या मुलासारखं रांगत, घसटत पुढं आलो आणि सरकारी यंत्रणेला मी दिसलो. त्यांनीच मला रात्री बारा वाजता उपचारांसाठी दाखल केलं.