मनोरुग्ण महिलेला ट्रस्टचा आधार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:23 AM2021-03-30T04:23:25+5:302021-03-30T04:23:25+5:30
तरडगाव : फलटण तालुक्यातील तरडगाव येथील पालखी तळ परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बेवारस अवस्थेत वास्तव्य करणाऱ्या अंदाजे ५० ...
तरडगाव : फलटण तालुक्यातील तरडगाव येथील पालखी तळ परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बेवारस अवस्थेत वास्तव्य करणाऱ्या अंदाजे ५० वर्षीय मनोरुग्ण महिलेला अखेर एका ट्रस्टचा आधार मिळाला आहे. सोमवारी संबंधित महिलेला ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी वाई तालुक्यातील वेळे येथील यशोधन चॅरिटेबल ट्रस्टमध्ये दाखल केले. यामुळे माणुसकीचे काम झाले आहे.
याबाबत माहिती अशी, काही महिन्यांपूर्वी येथील प्राथमिक शाळेत एक मनोरुग्ण महिला आली होती. ऐन कडाक्याच्या थंडीत ती अंगावर पांघरूण नसतानाही वास्तव्य करत होती. काही दिवसांनी तिने आपला मुक्काम हलवला व ती पालखी तळाकडे गेली. त्या ठिकाणच्या रस्त्याकडेला झाडाझुडपाच्या आडोशाला गोळा केलेल्या चिंध्या अंगावर पांघरून घेत वास्तव्य करत होती. तिला तिचे नाव, गाव काही सांगता येत नव्हते.
दरम्यान, काही नागरिक तेथून जाताना संबंधित महिलेला खाण्यासाठी पदार्थ व पाणी देत. अशा स्थितीत मनोरुग्ण आणि ती ही महिला असल्याने भविष्यात अडचणी निर्माण न होता तिची राहण्याची कायमची चांगली सोय व्हावी, यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला. त्यानंतर यशोधन चॅरिटेबल ट्रस्टचे रवी बोडके यांच्याशी चर्चा केली. तसेच याकामी येथील डॉ. राजकुमार निकम व डॉ. राजश्री निकम या दाम्पत्यांनी देखील सहकार्य केले.
अखेर ट्रस्टने महिलेला आश्रमात दाखल करून घेण्यासाठी सहमती दर्शविली तर महिलेची तरडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कदम यांनी कोरोना तपासणी केली. तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर केंद्राच्या रुग्णवाहिकेत उपसरपंच प्रदीप गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य संतोष कुंभार, दीपक गायकवाड, ऋषिकेश चव्हाण, राहुल राऊत, रणजित भालेराव आदींनी महिलेला बसवून वेळे येथे नेले. तर एका मनोरुग्ण महिलेला आधार मिळवून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
\\\\\\\\\\\\\\\\\\\