संसर्गाची साखळी तोडण्याचा प्रयत्न करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:35 AM2021-04-26T04:35:59+5:302021-04-26T04:35:59+5:30
पाटण तालुक्यातील येराड-खंडुचावाडा येथे एकाच दिवशी तब्बल ४४ कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर तहसीलदार योगेश टोम्पे यांनी तातडीने गावाला भेट ...
पाटण तालुक्यातील येराड-खंडुचावाडा येथे एकाच दिवशी तब्बल ४४ कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर तहसीलदार योगेश टोम्पे यांनी तातडीने गावाला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. गटविकास अधिकारी मीना साळुंखे, वैद्यकीय अधिकारी सुप्रिम काबळे, सरपंच प्रकाश साळुंखे, पोलीस पाटील रवींद्र साळुंखे, प्रकाश साळुंखे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
तहसीलदार योगेश टोम्पे म्हणाले, येत्या काही दिवसांत आपले गाव कोरोनामुक्त होईल, यावर सर्वांनी लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. प्रशासन त्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करीत असून, ग्रामस्थांनी प्रशासकीय नियमांचे पालन करून सहकार्य करावे. गावातील युवकांनी त्याकामी पुढाकार घ्यावा. ग्रामस्थांना कसलीही मदत लागल्यास मी उपलब्ध आहे. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करावा. प्रशासनाकडून कदाचित उशीर होऊ शकतो. मात्र, गावाकडे दुर्लक्ष होणार नाही.
येराड-खंडुचावाडा येथे रविवारी, दि. २५ रोजी दुसऱ्या टप्पात ३६ जणांची चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये आठ जण बाधित आढळले असून, गावातील रुग्णसंख्या ५६ झाली आहे. गत दोन दिवसांपासून हेळवाक आरोग्य केंद्राचे पथक याठिकाणी येत असून, सर्वांची तपासणी, औषधोपचार व चाचण्या केल्या असून बाधितांची प्रकृतीतही सुधारणा झाली आहे.
- चौकट
ती वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून...
दरम्यान, शनिवारी बाधितांच्या नातेवाइकांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला होता. आरोग्य विभागातील अपुरी कर्मचारी संख्या व भागातील वाढलेली कोरोनाबाधितांची संख्या अशी परिस्थिती व्हिडिओद्वारे मांडण्यात आली होती. तसेच ऑक्सिजन व बेडचा तुटवडा असल्याच्या चर्चाही सुरू असून, या चर्चांमुळे भयभीत झालेल्या ग्रामस्थांनी आपल्यावर ही वेळ येऊ नये, यासाठी व्हिडिओ केल्याचे सांगण्यात येत आहे.
फोटो : २५केआरडी०४
कॅप्शन : येराड-खंडुचावाडा, ता. पाटण येथे तहसीलदार योगेश टोम्पे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी रात्री उशिरापर्यंत थांबून ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.