जन्मभूमीच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:23 AM2021-07-23T04:23:31+5:302021-07-23T04:23:31+5:30
सणबूर : ‘गावासाठी स्वखर्चातून पदरमोड करून काहीतरी करणारी माणसे अलीकडे फार कमी दिसतात; पण विश्वासराव कोळेकर यांनी आपल्या जन्मभूमीच्या ...
सणबूर : ‘गावासाठी स्वखर्चातून पदरमोड करून काहीतरी करणारी माणसे अलीकडे फार कमी दिसतात; पण विश्वासराव कोळेकर यांनी आपल्या जन्मभूमीच्या प्रेमापोटी केलेले काम कौतुकास्पद आहे. जन्मभूमीच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा,’ असे मत काँग्रेसचे प्रांतिक प्रातिनिधी हिंदुराव पाटील यांनी केले.
मंद्रुळकोळे खुर्द (ता. पाटण) येथे गावच्या प्रवेशद्वाराची कमान विश्वासराव कोळेकर यांनी उभारली आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी पाटील बोलत होते. यावेळी सरपंच सतीश कापसे, माजी सरपंच वासंती पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दादासाहेब साळुंखे, अरविंद कुंभार, बबनराव भोई, बांधकाम ठेकेदार प्रल्हाद मोरे, दीपक कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
हिंदुराव पाटील म्हणाले, ‘मंदुळकोळे खुर्द गावात पाणी योजना, सभामंडप, रस्ते, गटार व्यवस्था, पथदिवे, स्मशानभूमी, वर्गखोल्या अशी अनेक विकासकामे केली आहेत. गावाचा सर्वांगिण विकास केला आहे. गावासाठी स्वखर्चातून कमान उभारणाऱ्या विश्वासराव कोळेकर यांच्यासारख्या लोकांची गरज आहे. यातून प्रेरणा घेऊन इतरांनीही गावासाठी भरीव काम करावे.’
यावेळी वसंत पाटील, सीताराम कुंभार, विलास साबळे, दगडू साबळे, हनुमंत कुंभार, सागर बर्वे, राजाराम सावंत, तानाजी साबळे, संतोष पाटील यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. दादासाहेब साळुंखे यांनी प्रास्ताविक केले तर रुपेश भोई यांनी आभार मानले.
फोटो : २२ केआरडी ०२
कॅप्शन : मंद्रुळकोळे खुर्द (ता. पाटण) येथे काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील यांच्या हस्ते स्वागत कमानीचे उद्घाटन करण्यात आले. (छाया : बाळासाहेब रोडे)