तीन एक्स्प्रेस लुटण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:01 AM2018-08-20T00:01:12+5:302018-08-20T00:01:17+5:30

Trying To Lose Three Express | तीन एक्स्प्रेस लुटण्याचा प्रयत्न

तीन एक्स्प्रेस लुटण्याचा प्रयत्न

Next

मिरज/सातारा/लोणंद : मिरज-पुणे रेल्वे मार्गावरील दोन रेल्वेस्थानकाजवळ सिग्नलची वायर कापून दरोडेखोरांनी तीन एक्स्प्रेस रेल्वे लुटण्याचा प्रयत्न केला. ही घटना सालपे व आदर्की स्थानकाजवळ रविवारी मध्यरात्री घडली. या चोरीच्या घटनेत प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या. दहा ते बारा दरोडेखोरांनी कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस, सह्याद्री एक्स्प्रेस व एलटीटी हुबळी एक्स्प्रेस या तीन रेल्वे लुटण्याचा प्रयत्न केल्याने सुरक्षा यंत्रणेची धावपळ उडाली.
रविवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी सालपे रेल्वेस्थानकाजवळील सिग्नलची वायर कापून कोल्हापूरहून मुंबईला निघालेली महालक्ष्मी एक्स्प्रेस व सह्याद्री एक्स्प्रेस लुटण्याचा प्रयत्न केला. या गाड्या थांबताच चोरट्यांनी खिडक्यांमधून आत हात घालत प्रवाशांचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला. गाडीतील एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसडा मारून तोडले. मंगळसूत्र महिलेच्या गळ्यात अडकून गाडीतच पडल्याने ते चोरट्यांच्या हाती लागले नाही. या गाडीला आरपीएफचा बंदोबस्त असल्याने गाडी थांबताच जवानांनी प्रवाशांना खिडक्या, दरवाजा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या. आरपीएफ जवान एम. ए. मोरे व राकेश कुमार यांनी दरोडेखोरांचा पाठलाग केला. मात्र दरोडेखोरांनी स्थानकाशेजारील शेतीच्या पिकातून पलायन केल्याने दरोड्याचा प्रयत्न फसला. या घटनेची माहिती मिळताच सातारा, मिरज आरपीएफ, मिरज रेल्वे पोलीस व लोणंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी पोलीस निरीक्षक अजय संसारे, उपनिरीक्षक एच. वाय. पवार, विनोद पवार, एस. डी. माने यांनी परिसरात दरोडेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन दरोडेखोरांनी पलायन केले.
घटनास्थळाची पुणे आरपीएफचे उपअधीक्षक मकरारीया यांनी भेट देऊन पाहणी केली. सालपे स्थानकातील घटनेनंतर आदर्की येथे लोकमान्य टिळक टर्मिनसहून हुबळीकडे निघालेली एक्स्प्रेसही सिग्नल वायर कापून अशाच पध्दतीने अडवून चोरट्यांनी लुटण्याचा प्रयत्न केला. या गाडीतील एका प्रवाशास लुटले. या गाडीत कोणत्याही प्रकारचा बंदोबस्त नसल्याने किती प्रवाशांना लुटले व किती वेळ गाडी थांबली, हे समजू शकले नाही. दरोडेखोरांनी लुटलेल्या बेळगाव येथील प्रवाशाने बेळगाव रेल्वे पोलिसात तक्रार दिली आहे.
तपासासाठी पथक
सालपे व आदर्की रेल्वेस्थानकाजवळील सिग्नलची वायर कापून दरोडेखोरांनी कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस, सह्याद्री एक्स्प्रेस व एलटीटी हुबळी एक्स्प्रेस लुटण्याचा प्रयत्न केल्याने प्रवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत मिरज रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपासासाठी विभागीय सुरक्षा आयुक्त डी. विकास यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले आहे.

Web Title: Trying To Lose Three Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.