दुचाकीस्वाराला वाचविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:07 AM2021-02-05T09:07:01+5:302021-02-05T09:07:01+5:30

कुडाळ-पाचगणी मार्गावर महू धरणाशेजारी समोरुन आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी चालकाने एसटी संरक्षक कठड्याला धडकवली. यामध्ये एसटीचे नुकसान झाले ...

Trying to save the biker | दुचाकीस्वाराला वाचविण्याचा प्रयत्न

दुचाकीस्वाराला वाचविण्याचा प्रयत्न

Next

कुडाळ-पाचगणी मार्गावर महू धरणाशेजारी समोरुन आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी चालकाने एसटी संरक्षक कठड्याला धडकवली. यामध्ये एसटीचे नुकसान झाले पण मोठा अनर्थ टळला. (छाया : दिलीप पाडळे)

००००००

शाळा गजबजल्या

सातारा : कोरोनामुळे गेल्यावर्षी मार्चमध्ये शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आल्या होत्या. आता कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही इंग्रजी माध्यमांच्या शाळा सोमवार, दि. १ पासून सुरू करणार आहेत.

०००००

पहाटे थंडी, दुपारी ऊन

कुडाळ : कुडाळसह भागात दोन-तीन दिवसांपासून पहाटेची चांगलीच थंडी पडत आहे. त्यामुळे सकाळपर्यंत गारठा जाणवत आहे, तर दुपारच्या वेळी उन्हाचा चटका बसत आहे. थंडी आणि ऊन यामुळे वातावरण बदलले असून आता उन्हाळ्याची चाहूल लागल्यासारखे जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मात्र थंडीची लाट ओसरली होती.

००००००००

पाणीसाठे आटले

सातारा : जिल्ह्यातील अनेक भागात यंदा चांगला पाऊस झालेला असल्याने पाणी चांगले असेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, अनेक नदी, ओढ्यांचे पाणी आटले आहे. भूजल पातळीत घट होत असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.

००००००

व्यवसाय पूर्वपदावर

सातारा : कोरोनामुळे तब्बल सहा महिन्यांचे लॉकडाऊन असल्याने अनेक व्यवसायांना फटका बसला होता. मात्र, आता हळूहळू सर्व व्यवहार पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे व्यापारी, कामगारांना दिलासा मिळाला आहे. मात्र, महामाई कायम असल्याने चिंतेचे वातावरण आहे.

००००००००००

कचरा उघड्यावर

पाचगणी : वाई-पाचगणी मार्गावरील पसरणी घाटात अज्ञात व्यक्ती रात्रीच्या वेळी कचरा उघड्यावर आणून टाकत असतात. काही जनावरे तेथेच कचऱ्यात खाद्यपदार्थ शोधत असतात. जैविक कचरा जनावरांच्या खाण्यात आला तर त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

०००००००

शाळेजवळील ट्रान्सफाॅर्मर धोकादायक

सातारा : कृष्णानगर येथील गोकुळ प्राथमिक शाळेच्या आवारातच वीज वितरण कंपनीचा ट्रान्सफाॅर्मर आहे. हा ट्रान्सफाॅर्मर मुलांसाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष घालून तो सुरक्षित ठिकाणी हलवावा किंवा काही तरी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी पालकांमधून केली जात आहे.

०००००

पाणी जातंय वाहून

सातारा : सातारा शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा केला जातो. पुरेशा दाबाने व मुबलक पाणीपुरवठा केला जात असल्याने पाण्याच्या टाक्या लवकर भरत असतात. मात्र, टाकी भरल्यानंतर पाणी बंद करणे गरजेचे आहे. तरीही सातारकर त्याकडे दुर्लक्ष करून पाणी वाहून दिले जाते.

०००००

गारठ्यात वाढ

सातारा : सातारा परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. पंधरा दिवसांपूर्वी गायब झालेली थंडी अचानक वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वातावरणातील बदलामुळे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढले असून दवाखान्यात गर्दी होत आहे.

०००००००

कलिंगड दाखल

सातारा : साताऱ्यातील सर्वच मंडईमध्ये कलिंगडांची आवक वाढली आहे. त्यामुळे त्यांना मागणीही वाढत आहे. सर्वसाधारणपणे पंधरा ते वीस रुपयांना कलिंगड मिळत आहेत. त्यामुळे त्यांना मागणी वाढत आहे. उन्हाळ्यात त्याची आवक आणखी वाढणार आहे. ग्रामीण भागातून शेतकरी साताऱ्यात कलिंगड घेऊन येत आहेत.

०००००००

गतिरोधक धोक्याचे

सातारा : साताऱ्यातील खालचा रस्ता परिसरात वाहनांचा वेग वाढला आहे. यामुळे अपघाताचा धोका लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनीच रात्रीच्या वेळेत गतिरोधक केला आहे. गतिरोधक गरजेचा असला तरी तो अशास्त्रीय असल्याने अपघातांना निमंत्रण देत आहे.

०००००

गव्हाचे पीक जोमात

कोरेगाव : कोरेगाव तालुक्यात सर्वत्र गव्हाचे पीक जोमात आहे. यंदा पाऊस चांगला झालेला असल्याने पीकही चांगले उगवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. जायगावमध्ये आठ हेक्टर क्षेत्रात काळा गहूचे उत्पादन घेण्यात आले असल्याचे संबंधित विभागातर्फे सांगण्यात आले.

०००००००००

निर्जंतुक फवारणी करण्याची गरज

सातारा : कोरोनाचा फैलाव झाला त्या वेळेस साताऱ्यातील बहुतांश वसाहतींमधील रहिवासी एकत्र येऊन इमारत स्वच्छता करत असत. रसायनांचा वापर करून निर्जंतुकीकरण केले जात होते, पण आता सर्वजण कामाला लागले असल्याने याकडे कोणाचेच लक्ष नाही. त्यामुळे कोरोनाचा धोका टाळण्यासाठी हा दिनक्रम पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे.

००००

साईडपट्टी उखडली

नागठाणे : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे काम चांगले झालेले आहे. त्यामुळे वाहनांचा वेग वाढलेला आहे. मात्र तारळेकडे जाण्याच्या मार्गावरील रस्त्याच्या साईडपट्ट्या खचल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो.

०००००००

बाजारात चोरीत वाढ

सातारा : साताऱ्यात जुन्या मोटार स्टॅण्ड परिसरात मोठ्या प्रमाणावर आठवडा बाजार भरत असतो. यासाठी ग्रामीण भागातून नागरिक मोठ्या संख्येने येतात. या गर्दीचा फायदा घेऊन काहीजण मोबाईल चोरी करत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

००००००

ग्रामीण रस्त्याच्या चढावर दगडांचा खच

सातारा : जिल्ह्यात ऊस हंगाम तेजीत असल्याने सर्वच भागांत ऊस वाहतूक ट्रॅक्टरद्वारे केली जात आहे. ग्रामीण भागात एकाच वेळी दोन-तीन ट्रॉली जोडल्या जातात. चढावर ऊस वाहतूक करणे अवघड जाते. ट्रॅक्टरचालकांचे हाल होतात. ट्रॉली मागे जाऊ नये म्हणून टायरला दगडे लावले जातात. ठरावीक अंतरावर तसेच करावे लागते. त्यामुळे ट्रॅक्टर चढ चढतो, पण दगडे न उचलताच ते निघून जातात.

०००००००

Web Title: Trying to save the biker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.