मंगळवार तळे स्वच्छतेचे पालिकेकडे पालकत्व!
By admin | Published: September 3, 2014 08:47 PM2014-09-03T20:47:19+5:302014-09-04T00:07:23+5:30
स्वच्छतेसाठी २२ लाख : विसर्जनानंतर मोहिमेला होणार सुरुवात
सातारा : मंगळवार तळ्यात गणेशमूर्ती विसर्जनास घातलेली बंदी खासदार उदयनराजे भोसले यांनी उठविली आहे. हे तळे त्यांच्या खासगी मालकीचे असले तरीही ते सार्वजनिक वापरासाठी देत असल्याने त्याच्या स्वच्छतेचे पालकत्व सातारा पालिकेलाच घ्यावे लागणार असून तळ्याच्या स्वच्छतेसाठी २२ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.
मूर्ती विसर्जनामुळे तळ्याच्या बाजूला राहणाऱ्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती तळ्यात बुडत नाहीत तसेच मूर्तींना लावलेले विषारी रंग तळ्यातील जलचर प्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरतात. गतवर्षी मूर्ती विसर्जनानंतर तळ्यात विषारी वायू तयार झाल्याने तळ्यातील पाणी दूषित झाले होते. या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने येथील नागरिकांनी उठाव केला होता.
मात्र, तरीही सार्वजनिक गणेश मंडळांची मागणी लक्षात घेऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी तळ्यामध्ये गणेशमूर्ती विसर्जनाला परवानगी दिली आहे.
गणेश उत्सव हा सार्वजनिक उपक्रम असल्याने लोकांच्या हितासाठी पालिकेला या तळ्याची स्वच्छता करणे भाग आहे. गणेशोत्सवानंतर पालिका तळ्याच्या स्वच्छतेचे काम हाती घेणार आहे. या कामाची टेंडर प्रक्रिया पालिकेने पूर्वीच राबविली होती. २२ लाख रुपयांचा निधी यासाठी खर्च केला जाणार आहे. गेल्या वर्षी पालिकेने एवढेच पैसे मोती तळ्याच्या स्वच्छतेसाठी खर्च केले होते.
दरम्यान, पुढील वर्षीपासून या दोन्ही तळ्यांमध्ये मूर्ती विसर्जन करण्यास बंदी घालण्यात येणार असल्याने सार्वजनिक मंडळांपुढे यक्षप्रश्न निर्माण होणार आहे. मूर्ती कमी उंचीच्या तसेच शाडू व मातीपासून बनविलेल्या मूर्ती बसविण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. (प्रतिनिधी)
‘लोकमत’च्या भूमिकेचे स्वागत
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ‘लोकमत’ ने पुढाकार घेतला होता. त्याप्रमाणे शहरातील बहुतांश नगरसेवकांनी वॉर्डातील हौदांच्या स्वच्छतेवर भर दिला आहे. पालिकेच्या माध्यमातून या हौदांची स्वच्छता सुरु आहे. पंताचा गोट, मंगळवार तळे, शनिवार पेठेतील काही हौदांची स्वच्छता करण्यात आली आहे. वॉर्डातील घरगुती गणेशमूर्तींचे या हौदातच विसर्जन केले जाणार आहे.
४४ लाखांचा निधी तळे स्वच्छतेसाठी
पालिकेने गतवर्षी मोती तळ्याची स्वच्छता करण्यासाठी २२ लाख रुपये खर्च केले होते. आता मंगळवार तळ्याच्या स्वच्छतेसाठी २२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
तळ्यांच्या स्वच्छतेसाठी एवढा मोठा निधी खर्च केला जात असल्याने त्याचा परिणाम शहरातील विकासकामांवर होत असल्याने अनेक ठिकाणी चांगले रस्तेही नाहीत.
आरोग्य व सार्वजनिक स्वच्छतागृहांना पाणीपुरवठ्याचाही प्रश्न आ वासून आहे.