अधिकाऱ्यांचा तुघलकी कायदा चालू देणार नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:36 AM2021-01-22T04:36:00+5:302021-01-22T04:36:00+5:30
कऱ्हाड पालिकेची मासिक सभा गुरुवारी सभागृहात पार पडली. नगराध्यक्ष रोहिणी शिंदे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. पालिकेची मासिक सभा मंगळवारी, दि. ...
कऱ्हाड पालिकेची मासिक सभा गुरुवारी सभागृहात पार पडली. नगराध्यक्ष रोहिणी शिंदे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. पालिकेची मासिक सभा मंगळवारी, दि. १९ झाली होती. त्या सभेत १४८ विषय होते. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ती सभा सुरू होती. चाळिसाव्या विषयावर थांबविण्यात आली होती. त्या पुढील विषयांसाठी गुरुवारी पुन्हा सभा घेण्यात आली.
शहरातील दत्त चौकातील बटाणे सायकल दुकानापासून शाहू चौकापर्यंत मलनि:स्सारणच्या हँगिंग पाइपलाइनच्या विषयावरून सभेत जोरदार खडाजंगी झाली. यावेळी जनशक्तीचे गटनेते राजेंद्र यादव यांनी आक्रमक पवित्रा घेतला. राजेंद्र यादव म्हणाले, पालिका अधिकाऱ्यांनी याच ठिकाणच्या रहिवाशांबाबत असा तुघलगी कायदा का आणला आहे. तुम्हाला अधिकार दिलेत, याचा अर्थ तुम्ही काहीही ठराव आणावेत असा नाही. तुम्ही चुकीच्या पद्धतीने ठराव आणून ते मंजुरीचा प्रयत्न करणार असाल तर तुमची गरज नाही. पालिका कशी चालवायची आम्हालाही चांगले कळते, असे राजेंद्र यादव म्हणाले.
कऱ्हाड पालिका स्वच्छ सर्व्हेक्षणात देशात अव्वल आली आहे. मात्र, अद्याप दत्त चौकाच्या मागील बाजूने जाणाऱ्या नागझरी नाल्याची स्वच्छता होऊ शकलेली नाही. पालिका स्थापनेपासून तो प्रश्न कायम आहे. पालिका सगळ्या शहरातील मैला पाणी नदीत नेऊन सोडत आहे. त्यावर पर्याय करता आलेला नाही. त्या प्रश्नावरून पालिकेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. स्वच्छ सर्वेक्षणात पहिला क्रमांक येणाऱ्या पालिकेची ही काळी बाजू आहे. ती सभागृहात मांडणार नव्हतो. मात्र या विषयामुळे तो विषय मांडावा लागत असल्याचे राजेंद्र यादव यांनी यावेळी सांगितले.
शहरात ड्रेनेजसाठी जवळपास ८७ किलोमीटरची पाइपलाइन टाकली आहे. त्यातील कोणाकडून रजिस्टर दस्त करून घेतला आहे का, त्याचा खुलासा करा. तो जर झाला नसेल तर मग येथेचा हट्ट कशासाठी पाहिजे. ते चालून देणार नाही. या हट्टामागून कोणाच्या मिळकती वाचवत आहात, त्याचा खुलासा अधिकाऱ्यांनी करावा, असे आव्हानही यादव यांनी दिले.
- चौकट
मलकापूरचे सांडपाणी रोखा
मैलापाणी नदीच्या पात्रात मिसळत असल्याच्या विषयावरून महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्मीता हुलवान यांनी मलकापूरचे सांडपाणीही मिसळत असून, त्यावरही कारवाई करण्याची मागणी पालिकेत केली. बनपुरीकर कॉलनीतून थेट नाल्याद्वारे पाणी शहराच्या नाल्यात मिसळत आहे. त्यामुळे मोठी कठीण स्थिती आहे. बनपुरीकर कॉलनीत मिसळणारे पाणी थांबवा, असे स्मिता हुलवान यांनी अधिकाऱ्याना सुनावले.