नोकरी सोडून फुलविली स्ट्रॉबेरी शेती!, साताऱ्यातील 'त्या' शेतकऱ्याला दिवसाआड पाच-सहा हजारचा फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 03:49 PM2023-01-31T15:49:49+5:302023-01-31T15:50:09+5:30
सहा गुंठ्यात साठ हजार खर्च करून मिळवले दोन लाखांचे उत्पन्न
सागर चव्हाण
पेट्री : कास पठार परिसरातील चिकणवाडी, कुसुंबी (ता. जावळी) येथील तुकाराम चिकणे यांनी खासगी पवन चक्की ऑपरेटर नोकरी सोडून सहा गुंठ्यात पाच हजार रोपांची स्ट्रॉबेरीची शेती फुलविली. नवनवीन यशस्वी प्रयोगातून स्ट्रॉबेरी फळाचे भरघोस उत्पादन प्राप्त होऊन परिसरातील बाजारपेठेसह पुणे, मुंबईत विक्री करत दिवसाआड पाच सहा हजार रुपयांचा फायदा होत आहे.
नोकरी नको एखादा व्यवसाय बरा, नोकरी सोडून आपल्याला काहीतरी करायचं आहे. असे विचार अनेकांना भांबावून सोडतात. सगळे ठीक आहे अनेकजण असा विचार करतात. मात्र जेव्हा नोकरी सोडायचा विचार येतो त्यावेळी मात्र ते दोन पावलं मागे येतात. अनेकांना त्यांचा संसार असतो. पाठीमागे त्यांचा प्रपंच असतो. आता नोकरी सोडून काहीतरी स्वतःचा व्यवसाय करायचं म्हटलं अन् त्यात अपयश आल्यावर कुटुंबाचे काय? आपल्या भविष्याच काय ? असा विचार सुद्धा बरोबर आहे. पण थोडा हा धाडसाचा प्रश्न आहे. ज्यांना आपल्या कामावर विश्वास आहे. ते असे निर्णय घेऊन यशस्वी देखील होतात.
अगदी याचप्रमाणे तुकाराम चिकणे या ध्येयवेड्या शेतकऱ्याने नोकरी नाकारून आपले नवे अस्तित्व निर्माण केले. यशामागे त्यांना साथ होती त्यांच्या पत्नीची. त्यांचा प्रेरणादायी प्रयोग नवी ऊर्जा निर्माण करणारा असून वायरमनची नोकरी सोडून शेतीत नवनवीन यशस्वी प्रयोग केले. एवढेच नव्हे तर त्यातून केलेली कमाई देखील वाखाणण्याजोगी आहे. सहा गुंठ्यात साठ हजार खर्च करून दोन लाखांचे उत्पन्न मिळविण्यात यश आले.
सहा गुंठ्यात स्ट्रॉबेरीची लागवड केली. डोंगरमाथ्यावरील वातावरणात लागवड करून यशस्वी उत्पादन घेत आहेत. शेतीची मशागत करून शेणखत, जीवांमृत वापरले. चार फुटांवर बेड तयार केले. कीटकनाशक, औषध फवारणी, ठिबक सिंचनाचा वापर केला. रोपांची लागवड केल्यानंतर ३० दिवसांनी फुले येऊन ५५ दिवसात फळास सुरुवात झाली. दहाव्या दिवशी फळ परिपक्व होऊ लागले.
लाल चुटूक रंग अन् चवीला गोडवा
फळांचा रंग गडद लाल असून मोठ्या फळांचे वजन दीडशे ग्रॅम पर्यंत आहे. झाडाला पिकल्याने गोडवा जास्त असून शंभर रूपयांना एक बॉक्स प्रमाणे आसपासच्या जिल्ह्यात तसेच मुंबई, पुण्यात विक्री होत असल्याचे समाधान मिळत आहे. भिलार मधील नारायण ढेबे मित्राकडून मार्गदर्शन मिळाले.
जैविक तसेच कीटकनाशक औषध फवारणी केली. ३५ दिवसांत फ्लॉवरींगमुळे उत्साह निर्माण होऊन माझ्यासाठी नवीन पीक होते. ६५ दिवसानंतर फळ येण्यास सुरुवात झाल्यानंतर आनंद निर्माण होऊन यशस्वी प्रयोगाचा अभिमान वाटतो. भविष्यात चांगला फायदा होईल. - तुकाराम चिकणे,