Satara News: कऱ्हाडात उड्डाणपुलाखालील बोगदे बंद; शहरात येणारी वाहतूक वळविली; जाणून घ्या नवा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 12:14 PM2023-02-07T12:14:31+5:302023-02-07T12:14:52+5:30

जुन्या पुलावर चारचाकीला ‘नो एण्ट्री’

Tunnels under flyover closed in Karad; Traffic coming into the city was diverted | Satara News: कऱ्हाडात उड्डाणपुलाखालील बोगदे बंद; शहरात येणारी वाहतूक वळविली; जाणून घ्या नवा मार्ग

Satara News: कऱ्हाडात उड्डाणपुलाखालील बोगदे बंद; शहरात येणारी वाहतूक वळविली; जाणून घ्या नवा मार्ग

googlenewsNext

कऱ्हाड : कोल्हापूर-सातारा लेनवरून कऱ्हाड शहरात प्रवेश करता येणाऱ्या सर्व बोगद्यांमधील वाहतूक सोमवारपासून बंद करण्यात आली, तर शहरात प्रवेश करणारी वाहतूक वारुंजी फाट्यावरील पाटण तिकाटणेतून वळविण्यात आली आहे. त्यामुळे पाटण तिकाटणेत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच मशिनरी दाखल झाल्यामुळे कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल लवकरच पाडला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणात कऱ्हाडातील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल पाडून त्याठिकाणी मोठा उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार गत पंधरा दिवसांपासून कार्यवाही केली जात आहे. कोल्हापूर नाक्यावर पंकज हॉटेलपासून ते खरेदी-विक्री पंपापर्यंत उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिगेड्स लावण्यात आले आहेत.

त्यामुळे दोन्ही बाजूला वाहतुकीसाठी केवळ एकच लेन आणि उपमार्ग शिल्लक राहिले आहेत. या परिस्थितीमुळे कोल्हापूर नाका परिसरात वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यातच उड्डाणपूल पाडण्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर याठिकाणच्या वाहतुकीत आणखी बदल करण्यात येणार आहे.

रविवारी पूल पाडण्याचे काम सुरू केले जाणार होते. मात्र, आवश्यक मशिनरी दाखल न झाल्यामुळे तसेच वाहतुकीच्या दृष्टीने खबरदारीच्या उपाययोजनांची कामे पूर्ण न झाल्यामुळे रविवारी काम सुरू करण्यात आले नाही. सोमवारी हे काम केले जाण्याची अपेक्षा होती. मात्र, सोमवारीही पूल पाडण्यास सुरुवात केली गेली नाही.

रविवारी रात्री उशिरापर्यंत कोल्हापूर बाजूकडून कऱ्हाड शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांसाठी नाक्यावरील एक बोगदा रिकामा ठेवण्यात आला होता. तेथूनच रहदारी सुरू होती. मात्र, सोमवारी सकाळी तो बोगदाही बंद करण्यात आला.

जुन्या पुलावर चारचाकीला ‘नो एण्ट्री’

पाटण तिकाटणेत कऱ्हाड शहरात येण्यासाठी यापूर्वी हलक्या चारचाकी वाहनांसाठी जुना पूल हा पर्याय होता. मात्र, सोमवारपासून वाहतूक वळविण्यात आल्यानंतर शहरात येणाऱ्या केवळ दुचाकी या पुलावरून सोडल्या जात आहेत. चारचाकी, तीनचाकी तसेच इतर वाहनांना पाटण तिकाटणेतून पूर्वेच्या उपमार्गाने कोल्हापूर नाक्यावर जाऊन तेथून शहरात प्रवेश करावा लागत आहे. मात्र, शहरातून बाहेर पडणाऱ्या हलक्या चारचाकी वाहनांची या पुलावरून वाहतूक सुरूच ठेवण्यात आली आहे.
 

Web Title: Tunnels under flyover closed in Karad; Traffic coming into the city was diverted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.