तहसीलदारांच्या दालनामध्ये गोंधळ
By admin | Published: January 27, 2016 10:55 PM2016-01-27T22:55:29+5:302016-01-28T00:29:03+5:30
एकास अटक : कागदपत्रे हिसकावून कामकाजात आणला होता अडथळा
कोरेगाव : येथील तहसील कार्यालयात तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी जोगेंद्र कट्यारे यांच्यासमोर मामलेदार कोर्ट अॅक्टनुसार जमिनीच्या प्रकरणामध्ये सुनावणी सुरू असताना चंद्रशेखर बाळासाहेब बर्गे याने अरेरावीची भाषा करत गोंधळ घातला. यावेळी त्याने शासकीय कागदपत्रे हिसकावून घेत शासकीय कामकाजात अडथळा आणला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत बर्गे याला ताब्यात घेत अटक केली. याप्रकरणी सायंकाळी बर्गे याच्या विरोधात शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी, की बुधवारी दुपारी तहसीलदार जोगेंद्र कट्यारे यांच्या दालनामध्ये सुनावणी सुरू होती. अर्जदार सुरेश कोंडिबा धनवडे, रा. धोम, ता. वाई या धरणग्रस्त खातेदार व चंद्रशेखर बाळासाहेब बर्गे यांच्यामधील प्रकरणात सुनावणी सुरू झाल्यानंतर दोघांना कट्यारे यांनी या प्रकरणी आपआपले वकील हजर आहेत काय, याप्रकरणी काही म्हणणे सांगायचे आहे काय, अशी विचारणा केली. धनवडे यांनी या अर्जाप्रमाणे माझी विनंती मान्य करावी, असे तोंडी म्हणणे सादर केले.
त्यानंतर कट्यारे यांनी बर्गे यांना नाव विचारले, त्याने नाव सांगितल्यानंतर आपले काही म्हणणे याप्रकरणी सादर करावयाचे आहे किंवा कसे, असे विचारले. त्यावर बर्गे याने याकामी मला काही म्हणणे द्यायचे नाही, काय करायचे आहे, ते कर. याजमिनी आमच्या आहेत, आम्ही त्या सोडणार नाही, तुला काय करायचे ते कर, मी काय सांगणार नाही, असे हातवारे करून आरडाओरडा केला. त्यावेळी कट्यारे यांनी तुमचे जे काही म्हणणे आहे, ते तुम्ही शांततेत सांगा, असे सांगितले. त्यावेळी बर्गे याने कट्यारे यांच्या दिशेने हातवारे करून अरेरावीच्या भाषेमध्ये ‘तु कोण सांगणार, मी कसेही वागेन, काहीही करेन, त्याच्याशी तुला काही घेणेदेणे नाही,’ असे ओरडून दंगा करून कट्यारे यांच्या मंचकाकडे आवेशाने येऊन सदर प्रकरणातील कागदपत्रे हिसकावून घेतली.
दरम्यानच्या काळात लिपिक प्रवीण शिंदे व शिपाई दिलीप अवघडे हे बर्गे यांच्याकडे कागदपत्रे परत घेण्यास गेले असता, त्याने कागदपत्रे देण्यास नकार देत बघून घेण्याची भाषा केली. (प्रतिनिधी)