हळद रुसली; व्यापारी हसले : पिवळं सोनं स्वस्त उत्पादक शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 01:07 AM2018-04-05T01:07:04+5:302018-04-05T01:07:04+5:30
संतोष खांबे ।
वडगाव हवेली : आवक वाढीचे कारण सांगत शेतकºयांचा शेतीमाल कवडीमोल दराने घेऊन त्याचा व्यापार करणारी मंडळीच आज मालक बनली असून, यामधून शेतकºयांची पिळवणूक होत आहे. काहीवेळा उत्पादनावरील खर्चापेक्षा मिळणारा नफाच कमी असतो. असाच काहीसा प्रकार हळद या पिकाबाबत होत असून, हळदीचे माहेरघर असणाºया वडगाव हवेली, ता. कºहाड परिसरातील शेतकरी कमी दरामुळे अस्थस्थ झाले आहेत.
जिल्ह्यात कºहाड व वाई तालुक्यात मोठ्या प्रमाणावर हळद पिकाची लागवड होते. कºहाडमध्ये वडगाव हवेली परिसरात ३०० ते ४०० एकर क्षेत्रावर हळदीची लागवड होते. हे पीक किमान ९ ते १० महिन्यांचे असून, त्याची लागण मे ते जूनदरम्यान होते. तर काढणी जानेवारी ते मार्चदरम्यान होते.लागणीनंतर वेळेवर पाणी देणे, औषध फवारणी, खताची मात्रा वेळेवर देणे गरजेचे असते.
जानेवारी ते मार्च या कालावधीत हळदीच्या काढणीची लगबग चालू होते. काढणीनंतर हळद शिजवणे, वाळविणे, पॉलिश करणे आदी करून बाजारपेठेत जाण्यायोग्य हळद तयार होण्यासाठी एक महिन्याचा कालावधी जातो. यावेळी शेतकरी डोळ्यात तेल घालून काळजी घेत असतो.
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची उलाढाल सांगली बाजारपेठेत होते. या परिसरातील सर्व माल येथेच विक्रीसाठी जातो. हळदीचा व्यवसाय हा पूर्णत: व्यापारी वर्गाच्या हातात असून, ते ठरवतील तोच दर शेतकºयाला मान्य करावा लागतो. व्यापारी आपल्या मनाने मालाची प्रत ठरवून त्यांना हवी तशी सोयीस्कर किंमत करून माल घेतात. परंतु ही प्रत कोणत्या निकषाने ठरवली जाते, याचा उत्पादक शेतकºयाला अजूनही शोध लागलेला नाही.
याबरोबरच काही वर्षांपूर्वी शंभर किलो वजनाची पोती असायची. परंतु काही वर्षांपासून व्यापाºयांच्या नियमांनुसार ५० किलोची गोणी भरणे बंधनकारक झाले. मात्र, त्या गोणीवर असणारे हमाली, तोलाई, दलाली व तूट याचे दर कायमच राहिले म्हणजे एकूणच शेतकºयांच्या नुकसानीत भरच पडत गेली. शेतकºयांना लिलाव पद्धतीमधील अंदाज नसल्याने व्यापारी मनमानी करून लिलाव करीत असतात. गत महिन्याच्या कालावधीत एका महिन्यात दरामध्ये ४ ते ५ हजारांचा चढ-उतार कशामुळे झाला. मात्र, तो का झाला, याबाबत शेतकºयांना कसलीच कल्पना नाही.
हळद बाजारपेठेत आणून त्याचा लिलाव होऊन विक्री झाली तरी शेतकºयाला मात्र त्याचे पैसे एक ते दीड महिन्यांनी हातात मिळतात. तेही पूर्वीच्या काळात रोख पैसे दिले जायचे. मात्र, सध्या धनादेश देऊन शेतकºयांची मोठ्या प्रमाणावर ससेहोलपट केली जाते.
नवनवीन प्रक्रिया उद्योगांची गरज
हळद उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकºयांनी नवनवीन प्रयोग आत्मसात करावयाची गरज आहे. हळदीवर प्रक्रिया उद्योगासाठी शासनस्तरावर हवे तेवढे प्रयत्न होताना दिसत नाहीत. शेतकºयांनाही यासाठी प्रक्रिया उद्योग जोखमीचे वाटत असल्याने शेतकरी तिकडे वळत नाहीत. हळदीची निर्यात झाल्यास व प्रक्रिया उद्योगास चालना मिळाल्यास शेतकºयांना आर्थिक लाभ होईल.
खर्च जास्त; नफा अल्प
हळद पिकासाठी उत्पादनाच्या प्रमाणात खर्चाचे प्रमाणही तितकेच असते. त्यामध्ये लागणीपूर्व मशागत, बियाणे खरेदी, खते, आंतरमशागत, औषध फवारणी व सर्वात महत्त्वाचा टप्पा काढणी, शिजवणे, वाळविणे व पॉलिश करणे आदींसाठी शेतकºयाला आर्थिक तडजोड करावी लागते. सर्व खर्च वजा जाता शेतकºयाला मिळणारा नफा हा अल्प प्रमाणात होतो. तर काहीवेळा दराची घसरण झाल्यास नफा होतही नाही. अशावेळी हळद पीक शेतकºयांसाठी जुगार असल्याचे व तो जुगार हरल्याचे दु:ख त्याला होते. यामुळे पूर्वपार कर्जाच्या छायेत असणारा शेतकरी अधिकच कर्जात अडकला जातो.
हळद हे पीक पावसावर अवलंबून असते. ज्यावेळी हळद लागवड क्षेत्रात वाढ होईल, त्यावेळी साहजिकच उत्पादनातही वाढ होते. मात्र, यावेळी आवक वाढल्याने दराची घसरण होते. अशावेळी हळद साठविण्यासाठी स्वतंत्र स्टोरेज उपलब्ध नसल्यामुळे कवडीमोल दराने शेतकºयाला आपला माल विकावा लागतो.
याकरिता हळद साठविण्यासाठी स्वतंत्र गोदाम होण्याची गरज असून, बाजारभाव कोसळल्यावर आर्थिक झळ बसत असते. तेजी येईपर्यंत गरजांच्या पूर्ततेसाठी पैसे उपलब्ध व्हावेत, यासाठी स्टोरेजमधील मालावर शेतमाल तारण योजनेसाठी विचार व्हावा व शासनदरबारी यासाठी प्रयत्न होणेची गरज आहे.