अवकाळीच्या तडाख्याने हळद रूसली!

By admin | Published: March 10, 2015 10:47 PM2015-03-10T22:47:03+5:302015-03-11T00:13:48+5:30

शेकडो पोती भिजली : हातातोंडाशी आलेला घास हिरावला; शेतकरी चिंतेत; शिवारात अद्यापही वाळवणीची लगबग

Turmeric ravaged by the drought! | अवकाळीच्या तडाख्याने हळद रूसली!

अवकाळीच्या तडाख्याने हळद रूसली!

Next

कऱ्हाड : हंगामात हळदीचे उत्पन्न चांगले मिळण्याच्या आशेने शेतकरी सुखावले होते. मात्र, मध्यंतरी हळदीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यातच गत आठवड्यात अवकाळी पावसाचाही तडाखा बसला. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांवर अश्रू ढाळण्याची वेळ आली आहे. कऱ्हाड तालुक्यात हळदीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. वडगाव हवेली, चचेगाव, जखिणवाडी, कापिल, सुपने, तांबवे, मसुर भागासह इतर गावांतही शेतकरी हळद पिक घेतात. दरवर्षी हळदीचा दर कमी जास्त होतो. मात्र, हे पिक फायद्यात जात असल्याने शेतकऱ्यांचा हे पिक घेण्याकडे सध्या ओढा वाढला आहे. दरवर्षी ऊसाच्या दराचा प्रश्न निर्माण होतो. ऊसाला अपेक्षित दर मिळत नाही. त्यातच कारखान्यांकडून वेळेत ऊसतोडणीही मिळत नाही. त्यामुळे कालावधी उलटून गेला तरी दरवर्षी ऊस शेतातच उभा असतो. परीणामी, पुढील पिकाला त्याचा मोठा फटका बसतो. ऊसाचा उत्पादन खर्च व त्यातून मिळणारे उत्पन्न याचा सारासार विचार केला असता शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नसल्याचे चित्र आहे. अल्प भुधारक काही शेतकरी ऊस शेतीमुळे तोट्यात गेल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. अशा परीस्थितीत हळद पिकातून चांगले उत्पन्न मिळू लागल्याने गत दोन वर्षापासुन तालुक्यातील शेतकरी या पिकाकडे वळला आहे.
साधारणपणे मे अथवा जुन महिन्यात हळद पिकाची लागवड केली जाते. लागवडीनंतर वारंवार शेतकऱ्यांना खुरपणी करावी लागते. तसेच हळदीसाठी सेंद्रीय खतही मोठ्या प्रमाणावर लागते. सेंद्रीय खत चांगले प्रमाणात मिळाले तर त्याचा पिकावर चांगला परीणाम दिसुन येतो. रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठीही शेतकऱ्यांना धडपड करावी लागते. वारंवार औषधांची फवारणी तसेच रासायनीक खताचा डोसही द्यावा लागतो. एवढे करूनही निसर्गाने साथ दिली नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरते. पावसाळ्याच्या अखेरच्या दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि ते पाणी शेतातच साचून राहिले तर पिक वाया जाण्याची भिती असते. त्यासाठीही शेतकऱ्यांना धडपड करून शेतात पाणी साचू नये, यासाठी उपाययोजना कराव्या लागतात. पावसाळा उलटून गेल्यानंतर हिवाळ्यात धुक्यामुळे हळद पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होता. यावर मात करण्यासाठी शेतकरी रोग प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी लागते.
साधारपणे हळद पिक आठ महिन्यांचे असते. आठ महिने पुर्ण झाल्यानंतर साधारणपणे जानेवारी अखेरीस हळदीचा पाला कापण्यास सुरूवात केली जाते. त्यानंतर खणणी व मोडणीही होते. मोडणीचे काम पुर्ण झाल्यानंतर हळद उकडावी लागते. मात्र, याच कालावधीत शेतकऱ्याला पिकाची जास्त काळजी घ्यावी लागते. उकडलेल्या हळदीवर पाऊस पडल्यास संपुर्ण उत्पन्न वाया जाण्याची भिती असते. त्यामुळे या कालावधीत येणारा पाऊस शेतकऱ्यांसाठी शत्रुच असतो.
यावर्षीही काही दिवसांपुर्वी अवकाळी पावसाचा कऱ्हाड तालुक्याला तडाखा बसला. उकडून वाळवणी करण्यासाठी टाकलेली हळद पावसात भिजली. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. भिजलेल्या हळदीचा सध्या रंग बदलला आहे. त्यामुळे या हळदीतून शेतकऱ्यांना कसलेही उत्पन्न मिळणार नाही. सध्याही काही ठिकाणी हळद काढणीची कामे सुरू आहेत. उकडणी व वाळवणीसाठी शेतकरी धडपडत आहेत. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांच्या मनातून पावसाची भिती गेलेली नाही. पाऊस कोसळला तर इतर शेतकऱ्यांची हळदही वाया जाण्याची शक्यता आहे. हळद भिजू नये, यासाठी शेतकऱ्यांनी खबरदारीच्या उपाययोजना केल्या असल्या तरी काही दिवसांपुर्वी झालेल्या पावसाने हळद शेतकऱ्यांवर रूसल्याचेच सध्या दिसुन येत आहे. (प्रतिनिधी)


दराबाबत अद्यापही संभ्रम...
गत तीन वर्षात हळदीचे भाव कमी झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनीही या पिकाकडे पाठ फिरविली होती. त्या कालावधीत साधारणपणे हळदीचे ३० टक्के क्षेत्र कमी झाले होते. गत काही महिन्यांपुर्वी व्यापाऱ्यांकडे हळद शिल्लक नसल्याचे सांगीतले जात होते. त्यामुळे हळदीला पंधरा हजारापर्यंत भाव मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. अशातच हळदीचे सौदे सुरू झाले आणि संप पुकारण्यात आल्याने सौद्यांची प्रक्रिया थांबली. परीणामी, शेतकऱ्यांनी हळद तयार होऊनही घरातच पोत्यांचा साठा करून ठेवला आहे.

Web Title: Turmeric ravaged by the drought!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.