हळद शेतकऱ्यांवर पुन्हा रुसली...

By Admin | Published: February 4, 2015 10:30 PM2015-02-04T22:30:46+5:302015-02-04T23:55:43+5:30

आर्थिक संकट : तीन वर्षांपासून दरात सतत उतार; क्विंटलला मिळतोय दहा हजारांपेक्षा कमी भाव

Turmeric resumes on farmers ... | हळद शेतकऱ्यांवर पुन्हा रुसली...

हळद शेतकऱ्यांवर पुन्हा रुसली...

googlenewsNext

कवठे : कवठे, ता. वाई परिसरातील शेतकऱ्यांची सध्या हळद पिकाच्या काढणीची लगबग सुरू झाली आहे. ऊस व हळद ही शेतकरी वर्गासाठी नगदी पिके समजली जातात. मात्र, एकेकाळी सोन्यासारखा दर मिळवून देणाऱ्या हळदीचे दर सध्या उतरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. हळदीपासून चांगले उत्पादन मिळत असल्यामुळे कवठेसह परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या पिकाची लागवड केली. मात्र, काही वर्षांनंतरच दुष्काळ, अतिवृष्टी अशा नैसर्गिक संकटाबरोबरच मजुरीचे वाढत्या दराचा या पिकावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला. परिणामी याचा हळदीच्या दरावरच परिणाम झाला. पाच वर्षांपूवी हळदीचा व सोन्याचा दर एकमेकांशी निगडीत व आसपास समजला जायचा व त्यामुळे हळदीला सोन्याचे पीक समजले जायचे. २१ हजार रुपये क्विंटल, असा उच्चांकी दर हळदीला मिळत होता. मात्र, गेल्या पाच वर्षांमध्ये सोन्याने उसळी मारली; मात्र हळदीच्या दरात मोठ्या प्रमाणात घट झाली. गेल्या तीन वर्षांमध्ये दहा हजार रुपये क्विंटलचा टप्पाही तिला ओलांडता आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनाही आता हळद विक्री करणे परवडेना झाले आहे. सामान्य शेतकरी मिळेल त्या किमतीत हळद विकून नशिबाची लाटरी अजमावू लागला तर सधन शेतकरी हळद वेअर हाउसला ठेवून हळदीचा दर वाढण्याची वाट पाहू लागला. मात्र, सलग तीन वर्षें वाट पाहूनसुद्धा हळदीचे दर वाढेनात तर वेअर हाउसचे भाडे शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडू लागले. याचा आणखी एक तोटा म्हणजे दोन-तीन वर्षें वेअर हाउसला हळद पडून राहिल्याने वजनालाही मार बसायला लागला व कमी वजन, वेअर हाउसचे भाडे व दर वाढेनात अशा तिहेरी कात्रीत शेतकरी अडकला.प्रत्येक वर्षी हळद काढणीच्या सुमारास दर वाढले जातात व शेतकऱ्यांची हळद बाजारात पोहोचेपर्यंत दर ढासळत जातात. त्यामुळे कष्ट करून जमिनीतून सोने पिकवणारा शेतकरी मात्र सोन्याचे पीक कवडीमोल भावात जाताना पाहून हवालदिल होत आहे. (वार्ताहर)


शेतकऱ्यांना अपेक्षा योग्य दराची
हळद काढून ती शिजवली जाते, यासाठी जुनी चूलवानपद्धत व नव्याने कुकरचा वापर केला जातो. नंतर ती उन्हात वाळवून तिला पॉलिश करून ती बाजारात पाठविली जाते. यामध्ये भरपूर वेळ व पैसाही खर्च होतो. ही सर्व प्रक्रिया करत असताना रात्रंदिवस हळदीची राखणही करावी लागते. यंदा तरी काढलेल्या हळदीला योग्य भाव मिळावा, ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

Web Title: Turmeric resumes on farmers ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.