आठवलेंवरील वात्रटिका बंद करा
By admin | Published: January 27, 2015 09:27 PM2015-01-27T21:27:26+5:302015-01-28T00:53:19+5:30
‘रिपाइं’चे निवेदन : जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडे मागणी
सातारा : रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांचा अवमान करणाऱ्या वात्रटिका सोशल मीडियातून प्रसारित केल्या जात आहेत. या वात्रटिका आंबेडकरी जनतेच्या भावाना दुखावणाऱ्या असून त्या तत्काळ बंद कराव्यात. याविषयी प्रशासनानेही योग्य ती दक्षता घ्यावी, अशी मागणी ‘रिपाइं’चे सातारा तालुका अध्यक्ष अप्पा तुपे यांनी एका निवेदनाद्वारे केला आहे.याबाबतचे एक निवेदन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल व पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, आही अज्ञात शत्रू जळावू वृत्तीने रामदास आठवले यांच्याविषयी व्हाट्स अॅप तसेच इतर सोशल मीडियावर विडंबन करणाऱ्या कविता, वात्रटिका प्रसारित करत आहेत. तुपे यांनी म्हटले आहे की, सोशल मीडिया हे समाजप्रबोधनाचे माध्यम आहे. त्याच्या माध्यमातून अनेक सकारात्मक गोष्टी घडू शकतात. मात्र आंबेडकरी विचारांची अॅलर्जी असणाऱ्यांना आमचे नेते रामदास आठवले यांच्या विषयी नेहमीच पोटदुखी राहिली आहे. अशीच मंडळी आठवले यांच्या नावाचा गैरवापर करून त्यांच्या नावे व्हाट्स अॅप तसेच इतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात विडंबनात्मक रचना सादर करीत आहेत. यामुळे रिपब्लीकन जनतेच्या आणि या पक्षावर प्रेम करणाऱ्या जनतेच्या भावना दुखावल्या जात आहे. अशा प्रकारच्या विकृत प्रवृत्तींना सायबर सेलच्या माध्यमातून पायबंद घालावा आणि पोलिसांनीही त्याकडे गांभीर्याने पहावे, अन्यथा रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडिया तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही अप्पा तुपे यांनी निवेदनात दिला आहे.
निवेदन देतेसमयी ‘रिपाइं’चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)