केळोलीला वळवाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:38 AM2021-05-10T04:38:23+5:302021-05-10T04:38:23+5:30
चाफळ : चाफळ विभागात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत हाहाकार माजवला. यात केळोली येथील बाळकृष्ण पांडुरंग ...
चाफळ : चाफळ विभागात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत हाहाकार माजवला. यात केळोली येथील बाळकृष्ण पांडुरंग साळुंखे यांच्या राहत्या घरावरील पत्र्यांचे छप्पर उडून जाऊन घरात सर्वत्र पाणी साचल्याने साळुंखे यांचा संसार उघड्यावर पडला. घरातील संसारोपयोगी साहित्यासह धान्याची पोती भिजल्याने खायचे काय, या विवंचनेत साळुंखे कुटुंबीयांनी रात्र दुसऱ्याच्या घरात जागून काढली.
चाफळच्या पश्चिमेला १० किलोमीटर अंतरावर केळोली गाव डोंगरपायथ्याला वसलेले आहे. गत पाच दिवसांपासून केळोलीसह परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दररोज दुपार झाली की, पाऊस हजेरी लावत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर, जोरदार पावसाने अनेकांच्या घराच्या भिंती कोसळल्या आहेत. शुक्रवारी केळोलीसह परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. यात बाळकृष्ण पांडुरंग साळुंखे यांच्या राहत्या घरावरील पत्र्यांचे छप्पर उडून जाऊन घरात सर्वत्र पाणी साचल्याने साळुंखे कुटुंबीय उघड्यावर पडले.
घरातील संसारोपयोगी साहित्यासह धान्याची पोती भिजून लाइटचे मीटर शाॅर्टसर्किटने जळाले. यात साळुंखे यांचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. केळोलीचे पोलीस पाटील चंदुगडे यांनी महसूल विभागास या घटनेची माहिती दिली असून, उशिरापर्यंत पंचनामा झाला नव्हता. साळुंखे कुटुंबाचा उदरनिर्वाह हा शेतीकाम करून सुरू आहे. हलाखीच्या परिस्थितीत राहत असणाऱ्या साळुंखे यांचे हातावरचे पोट आहे. प्रशासनाने या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.