नवी मुंबईतील मराठा आरक्षण बैठकीकडे फिरवली पाठ, उदयनराजेंनी धरली नाशिकची वाट !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 12:19 PM2020-10-07T12:19:09+5:302020-10-07T12:20:58+5:30

नवी मुंबईतील बैठकीकडे पाठ : मराठा आरक्षणाबाबत उदयनराजे साताऱ्यात घेणार राज्यस्तरीय बैठक

Turned back to Maratha reservation meeting in Navi Mumbai, Udayan Raje return for Nashik! | नवी मुंबईतील मराठा आरक्षण बैठकीकडे फिरवली पाठ, उदयनराजेंनी धरली नाशिकची वाट !

नवी मुंबईतील मराठा आरक्षण बैठकीकडे फिरवली पाठ, उदयनराजेंनी धरली नाशिकची वाट !

Next
ठळक मुद्देया बैठकीला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे खासदार संभाजी राजे छत्रपती हे दोघेही एकत्रित उपस्थित राहणार असल्याची माहिती होती; परंतु उदयनराजेंनी या बैठकीकडे पाठ फिरवली. 

सातारा : एक नेता एक आवाज ही घोषणा खरी ठरवत खासदार उदयनराजे भोसले यांनी नवी मुंबईत आज होणाऱ्या मराठा आरक्षण बैठकीकडे पाठ फिरवली. मुंबईची वाट न धरता ते थेट नाशिकला गेल्याचे त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या  मागणीसाठी जोरदार पाठपुरावा सुरू आहे. मराठा समाजाचे नेते विविध ठिकाणी बैठका घेत आहेत. शिवसंग्राम पक्षाचे आमदार विनायक मेटे यांनी ३ ऑक्टोबर रोजी पुण्यात बैठक आयोजित केली होती. या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांचे बंधू आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांना देखील निमंत्रण देण्यात आले होते. परंतु या बैठकीकडे त्यांनी पाठ फिरवली होती.

आता माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी नवी मुंबईतील माथाडी भवनात बुधवारी मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे खासदार संभाजी राजे छत्रपती हे दोघेही एकत्रित उपस्थित राहणार असल्याची माहिती होती; परंतु उदयनराजेंनी या बैठकीकडे पाठ फिरवली. महिनाभरापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला देण्यात आलेल्या एसईबीसी आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात मराठा समाजामध्ये संतापाचे वातावरण पसरलेले आहे. मराठा समाजाला मागास समाजाप्रमाणे आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी २०१६ पासून संपूर्ण राज्यभर लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत आहेत. तब्बल ५३ मोर्चे राज्यात काढण्यात आले. अत्यंत शांततेच्या मार्गाने मराठा समाजातील युवक-युवतींनी रस्त्यावर उतरून आपले प्रश्न मांडले.

अत्यंत दारिद्र्यात जीवन कंठणाऱ्या समाजबांधवांच्या प्रश्नांना घेऊन उदयनराजे भोसले तसेच संभाजीराजे यांनी पोटतिडकीने आंदोलनात सहभाग घेतला आहे. आंदोलनाला योग्य दिशा देऊन कायदेशीर मार्गाने कशा पद्धतीने यश मिळवता येईल, यासाठी मराठा नेते आग्रही भूमिका घेत आहेत. दरम्यान, नवी मुंबई येथे नरेंद्र पाटील यांनी आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित न राहण्याचेच उदयनराजेंनी पसंत केले. नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेच्या माध्यमातून उदयनराजेंच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती. आता उदयनराजे भाजपमध्ये गेले आहेत तर नरेंद्र पाटील हे शिवसेनेतच आहेत. राज्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष हा शिवसेनेसोबत सत्तेत आहे. त्यामुळे कुठल्याही एका पक्षासोबत  मराठा समाजाला नेऊन पुन्हा अडथळे निर्माण होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी या बैठकीला न जाणेच पसंत केल्याचे सांगितले जात आहे.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले देखील नवी मुंबई येथील बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. या बैठकीचे आपल्याला निमंत्रण नव्हते असे स्पष्टीकरण आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी दिलेले आहे. उदयनराजे नाशिक येथे नातेवाईकांना भेटायला गेलेले आहेत तिथून परतल्या नंतरच मराठा आरक्षणाबाबतच्या लढ्याची मोठी घोषणा ते करतील, अशी शक्यता आहे.

नाशिकवरून परत आल्यानंतर मोठी घोषणा

उदयनराजे खासगी कामानिमित्त नाशिकला गेलेले आहेत. नाशिकवरून परतल्यानंतर ते साताऱ्यात होणाऱ्या मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीबाबतची मोठी घोषणा करणार आहेत. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियम हॉलमध्ये ही बैठक होणार असल्याची खात्रीशीर माहिती असून तारीख आणि वेळ उदयनराजे जाहीर करतील, असे त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी सांगितले.

Web Title: Turned back to Maratha reservation meeting in Navi Mumbai, Udayan Raje return for Nashik!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.